सातारा गारठला, दीड महिन्यानंतर हुडहुडी वाढली
By नितीन काळेल | Published: December 15, 2023 01:11 PM2023-12-15T13:11:01+5:302023-12-15T13:12:33+5:30
या वर्षातील हे नीच्चांकी तापमान
सातारा : जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर थंडीची तीव्रता वाढत चालली असून यंदा प्रथमच शुक्रवारी सातारा शहराचा पारा १३ अंशापर्यंत खाली आला. त्यामुळे नागरिकांनी हुडहुडी भरुन राहिली. तर ग्रामीण भागात चांगलाच गारठा वाढल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. हळूहळू थंडीची तीव्रता वाढत जाते. गेल्यावर्षी तर ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीला सुरूवात झाली होती. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच गारठा जाणवला. यामुळे शहरासह ग्रामीण भागही गारठला होता. यंदा मात्र, थंडीला उशिरा सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी जाणवली. तसेच डिसेंबर महिना उजाडला तरी तीव्रता नव्हती. मात्र, मागील चार दिवसांत हवेत थंड लहर होती. तसेच हवामान विभागानेही थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार थंडीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच बहुतांशी ठिकाणचा पारा १५ अंशाच्या खाली गेला आहे.
सातारा शहरात तर शुक्रवारी १३.२ अंशाची नोंद झाली. गेल्या दीड महिन्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले आहे. यामुळे वातावरणात गारवा वाढला असून नागरिकांना ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. तर ग्रामीण भागातही थंडीचा परिणाम जाणवणार आहे. शेतीच्या कामावर याचा परिणाम होऊ शकतो. तर यावर्षी आतापर्यंत थंडी कमी असल्याने शेकोट्याही पेटल्या नव्हत्या. पण, आता यापुढे थंडीत वाढ झाल्यास शेकोट्यांना सुरूवात होणार आहे.
दरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पाराही खालावला आहे. आतापर्यंत १४ ते १५ अंशापर्यंत तेथील नीच्चांकी पारा होता. आता त्यामध्ये वाढ होत चालली आहे. शुक्रवारी तर महाबळेश्वरमध्ये १२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. या वर्षातील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर यामुळे थंडीची तीव्रता चांगलीच जाणवली.
सातारा शहरातील नोंद किमान तापमान..
दि. १ डिसेंबर २०.०१, २ डिसेंबर १६.०१, ३ डिसेंबर १५.०८, ४ डिसेंबर १५.०९, ५ डिसेंबर १५.०२, दि. ६ डिसेंबर १५.०२, ७ डिसेंबर १३.०६, ८ डिसेंबर १४.०३, ९ डिसेंबर १४.०७, १० डिसेंबर १५.०५, दि. ११ डिसेंबर १५, १२ डिसेंबर १५.०५, १३ डिसेंबर १४.०४, १४ डिसेंबर १३.०५ आणि दि. १५ डिसेंबर १२.०५