आईला विषारी सापाने केला दंश, तरीही मुलाने सापाच्या अकरा पिलांना दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:31 PM2022-06-20T18:31:05+5:302022-06-20T18:31:27+5:30
आई सर्पदंशातून बचावली आहे अन् सापाची अकरा पिलंही नैसर्गिक अधिवासात सोडल्याचा दुहेरी आनंद
कोयनानगर : विषारी सापाने दंश केल्यामुळे आई जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. हे समजल्यावर पुण्यात असलेल्या मुलाने वन्यजीव रक्षक मित्राला जाऊन पाहण्यास सांगितले. तेव्हा घोणस या विषारी सापाने दंश केल्याचे लक्षात आले. मात्र, आई सुखरूप असल्याचे मित्राने मुलाला फोन करून सांगितले. त्याचवेळी घरी जाऊन शोध घेतला असता अकरा पिलं आढळून आली. त्यांना सर्पमित्राने सुरक्षितस्थळी सोडले.
याबाबत माहिती अशी की, आंब्रग येथील छाया बबन निकम यांना गुरुवार, दि. १६ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्या झोपेत असताना घोणस सापाच्या पिलाने दंश केला. हे लक्षात आल्यावर छाया निकम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ही माहिती त्यांचा मुलगा सर्पमित्र अक्षय निकम यांना समजली. तेव्हा ते पुण्यामध्ये होते. त्यांनी तत्काळ कोयनानगर येथील वन्यजीव अभ्यासक व रक्षक विकास माने यांना जन्मलेल्या पिलाने दंश केला. त्यामुळे त्यांना तत्काळ सातारा येथील वन्यजीवरक्षक सुमित वाघ यांना रुग्णालयात जाऊन परिस्थिती पाहण्यास सांगितले.
सुमित वाघ वेळ न घालवता रुग्णालयात पोहोचले. घोणस सापाच्या पिलाचा दंश झाला असून, व्यवस्थित उपचार सुरू असल्याचे कळवले. घोणस सापाचे पिलू असल्याचे समजताच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला घोणस सापाची मादी ८ ते ६४ पिलांना जन्म देते. यामुळे आणखी पिलं असल्याचा संशय बळावत होता. अक्षय यांनी घरी जाऊन आणखी पिलं आहेत का, याचा शोध घ्यायचं ठरवलं व त्यांनी आंब्रग येथील घरी जाऊन घरामध्ये आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना अकरा पिलं मिळाली. अक्षय यांनी त्या पिलांना सुरक्षितस्थळी सोडून कर्तव्य पार पाडले.
यावेळी मल्हारपेठ येथील वन्यजीवरक्षक विनायक कदम, मोरगिरी येथील वन्यजीवरक्षक अक्षय हिरवे, कोयनानगर येथील वन्यजीवरक्षक दत्ता कांबळे, विकास माने यांनी अक्षय निकम यांच्या घरी भेट देऊन परिसरात पाहणी केली.
आई सुखरूप... पिलंही सुरक्षित
मी लहानपणासून शेकडो साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत. सध्या नोकरीनिमित्ताने पुण्यात आहे. त्या ठिकाणीही साप पकडत आहे. आई सर्पदंशातून बचावली आहे अन् सापाची अकरा पिलंही नैसर्गिक अधिवासात सोडल्याचा दुहेरी आनंद आहे. आणखी पिलं असण्याची शक्यता असून, आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती सर्पमित्र अक्षय निकम यांनी दिली.