सातारा : तळबीडमधील खुनाचा गुन्हा सहा तासांत उघड
By दत्ता यादव | Published: April 30, 2023 10:08 PM2023-04-30T22:08:45+5:302023-04-30T22:09:07+5:30
याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याच गावातील एकाला अटक केली आहे.
सातारा : तळबीड, ता. कऱ्हाड येथील महेंद्र शंकर वाघमारे (वय ४७) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात तळबीड पोलिसांना अवघ्या सहा तासांत यश आले. गावातील लोकांना खोटी माहिती देतो, या कारणावरून महेंद्र वाघमारे यांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याच गावातील एकाला अटक केली आहे.
दिलीप मारुती साळुंखे (रा. तळबीड, ता. कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र वाघमारे यांचा शुक्रवारी रात्री अज्ञाताने गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. यानंतर तळबीड पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी त्याच गावातील दिलीप साळुंखे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
महेंद्र वाघमारे हे मारुती मंदिरामध्ये बसले होते. त्यावेळी दिलीपने गावातील लोकांना माझ्याबद्दल खोटी माहिती का देतो, याचा जाब विचारला. तेव्हा वाघमारे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चिडून जाऊन दिलीप साळुंखे याने वाघमारे यांचा मंदिरात असलेल्या झेंड्याच्या कापडाने गळा आवळला. त्यानंतर चाकूने छातीवर, पोटावर वार करून त्यांचा खून केला. न्यायालयाने दिलीप साळुंखे याला ४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, कऱ्हाडचे उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. वरोटे, फाैजदार जी. आर. बाकले, एस. एम. पिसाळ आदींनी ही कारवाई केली. या पथकाने गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे काैतुक केले.