सांगलीतील उद्योजक सुमेध शहांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले, सौमितच्या मौल्यवान वस्तू गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:09 PM2022-11-08T13:09:03+5:302022-11-08T13:09:32+5:30

एवढेच नव्हे तर संरक्षण कठडे तोडून धडकलेल्या अवस्थेत त्याची कार आढळल्याने पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.

The mystery of the death of Sumedh Shah's son, an entrepreneur in Sangli, increased Saumit valuables are missing | सांगलीतील उद्योजक सुमेध शहांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले, सौमितच्या मौल्यवान वस्तू गायब

छाया : मुराद पटेल

googlenewsNext

शिरवळ : सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले असून, त्याची सोन्याची चेन, अंगठी, हातामधील सोन्याचे कडे, डिजिटल घड्याळ व महागडा मोबाइल गायब झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर संरक्षण कठडे तोडून धडकलेल्या अवस्थेत त्याची कार आढळल्याने पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील प्रसिध्द उद्योजक सुमेध शहा यांचा एकुलता एक मुलगा असलेला सौमित शहा हा पुण्यातील वाकड, पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी जेवण करण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. जेवण ऑनलाइन मागविल्यानंतर अचानकपणे सौमित याने मी मैत्रिणीला भेटून येतो, असे सांगत कारमधून निघून गेला. मात्र उशिरापर्यंत तो आला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह निरा नदीत आढळून आला. त्याचा घातपात झाला की त्याने आत्महत्या केली, याचे गूढ शवविच्छेदनानंतरही कायम आहे.

सोमवार, दि. ७ रोजी दुपारी सातारा येथील ठसे तज्ज्ञांना व ‘वीर’ या श्वानाला पाचारण करण्यात आले. कार आढळून आलेल्या ठिकाणी कारसह परिसराची कसून तपासणी करण्यात आली. परंतु ठसे तज्ज्ञांच्या हाती काही सापडले आहे का, हे मात्र, गोपनीय ठेवण्यात आले आहे. साैमितच्या कारने सारोळा पुलाच्या परिसरातील संरक्षण कठडेही तोडले आहेत. कारची पुढची बाजू चेपली आहे. तर दुसरीकडे साैमितच्या माैल्यवान वस्तू गायब झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे.

फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, जितेंद्र शिंदे, तुषार अभंग, नितीन महांगरे, सचिन वीर, सुनील मोहरे, मंगेश मोझर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ परिसर पिंजून काढला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करीत आहेत.

दरम्यान, सोमवार सकाळी सांगली येथील स्मशानभूमीमध्ये सौमित शहा याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल उलगडणार रहस्य...

सौमितच्या मौल्यवान दागिन्यांसह त्याचा महागडा मोबाइलही गायब झाला आहे. या मोबाइलचा सीडीआर आणि लोकेशन काढल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. साताऱ्यातील सायबर तज्ज्ञ अजय जाधव हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: The mystery of the death of Sumedh Shah's son, an entrepreneur in Sangli, increased Saumit valuables are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.