पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:04 PM2024-10-26T15:04:17+5:302024-10-26T15:04:53+5:30

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

the names of youths in the place of senior disabled voters In Patan taluka, the chaos of the administration | पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार

पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार

सणबूर : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बीएलओच्या माध्यमातून गावोगावी घरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांकडून टपाली मतदानासाठी १२ डी भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरून देणाऱ्या ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करता येणार आहे. मात्र पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात अनेक ज्येष्ठ, दिव्यांग मतदार राहिले बाजूला आणि त्या ठिकाणी तरुण मतदारांची नावे आल्याने प्रशासनाचा सावळागोंधळ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांचे जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन प्रशासनाच्या वतीने मतदानाचे आवाहन केले जात आहे. निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे.

ही माहिती देण्यासाठी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील बीएलओ कार्यरत आहेत. बीएलओच्या माध्यमातून गावातील शहरातील घरोघरी जाऊन ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. बीएलओंकडून ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांना १२ डी याची माहिती दिली जात आहे. या अर्जात टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घरातूनच केले जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.

घरातूनच मतदानाची सोय व्हावी

  • जे मतदार दिव्यांग व ज्येष्ठ आहेत, चालताही येत नाही असे मतदार कसे मतदान करणार? प्रशासन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करत आहे. 
  • मात्र असे प्रकार होत असल्याने मतदानाचा टक्का कसा वाढणार? याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन अशा मतदारांचे मतदान घरातच करून घेण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: the names of youths in the place of senior disabled voters In Patan taluka, the chaos of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.