लिफ्ट दिली नाही म्हणून रागाच्या भरात शेजाऱ्याची दुचाकीच पेटवली, एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:31 PM2022-05-07T13:31:43+5:302022-05-07T13:47:15+5:30
येता-जाता त्याने लिफ्ट मागितल्याने जाधव यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘तुझ्या गाडीला पण दाखवितो आणि तुला पण’, अशी धमकी दिली होती. मात्र, याकडे जाधव यांनी दुर्लक्ष केले.
सातारा : येता-जाता नेहमी दुचाकीवरून इकडे सोड, तिकडे सोड म्हणणाऱ्या शेजाऱ्याला दुचाकीवरून लिफ्ट दिली नाही म्हणून रागाच्या भरात त्याने शेजाऱ्याची दुचाकीच पेटवून दिली. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील सदर बझारमधील कांगा काॅलनीत काल, शुक्रवारी (दि.६) मध्यरात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. महेश मोरे (वय ४२, रा. सदर बझार सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बझारमधील कांगा काॅलनीत राहणारे संजय जाधव हे साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये काम करतात. त्यांच्याच शेजारी महेश मोरे राहतो. येता-जाता त्याने लिफ्ट मागितल्याने जाधव यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘तुझ्या गाडीला पण दाखवितो आणि तुला पण’, अशी धमकी दिली होती. मात्र, याकडे जाधव यांनी दुर्लक्ष केले.
दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेतीनच्या सुमारास महेश मोरे याने संजय जाधव यांची दुचाकी पेटवून दिली. खिडकीमध्ये मोठा प्रकाश पडल्याने जाधव यांच्या आईला जाग आली. त्यांनी झोपेतून उठून पाहिले असता दुचाकी पेटल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्याने संजय जाधव व त्यांचे भाऊही झोपेतून उठले. या दोघांनी घरातील पाणी आणून ही आग विझविली. त्यावेळी मोरे हा तेथून पळून जाताना जाधव व त्यांच्या आईला दिसला. यामध्ये जाधव यांचे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.
जळतं फडकं पुरावा
दुचाकी पेटविण्यासाठी टाकलेले फडके हे मोरे याचेच असल्याचे जाधव यांनी ओळखले. हे फडकेही त्यांनी पुरावा म्हणून स्वत:जवळ ठेवले आहे. या प्रकारानंतर संजय जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेनंतर मोरे हा पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत महिला पोलीस नाईक एस. आर. सपकाळ या अधिक तपास करीत आहेत.