खंबाटकीचा नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २३ पर्यंत पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 10:04 PM2022-07-06T22:04:58+5:302022-07-06T22:05:34+5:30
खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश गडकरी यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली.
खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश गडकरी यांनी केला आहे. यानुसार पुणे-सातारा या राष्ट्रीय हामार्ग क्र. ४ वर सद्या प्रत्येकी ३ मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे कार्य सुरु असून इंग्रजीवर्णाक्षर 'एस' प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी घट होईल.
खंबाटकीच्या नवीन दोन स्वतंत्र बोगदे दुहेरी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असून यामध्ये वाहनचालकांच्या सोयीसाठी आधुनिक एलईडी लाईट, व्हेंटीलेशनसाठी सिलिंग डक्ट फॅन, अग्निशमन व्यवस्था, व्हिडीओ नियंत्रण सुविधा व बोगदा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक वळविण्यासाठी दोन्ही बोगदे प्रत्येक ४०० मीटरवर क्रॉस लेनने जोडण्यात येणार आहेत.
खंबाटकीचा नवीन बोगदा मार्गाचे वेळे ते खंडाळा असा सुमारे ६. ३ किलोमीटरचा नवीन सहापदरी रस्ता बनवला जात आहे. यामध्ये दोन्ही बोगदे ११४८ मीटर लांबीचे राहणार आहेत. त्याची रुंदी १६. १६ मीटर व सुमारे ९. ३१ मीटर उंच असणाऱ्या या बोगद्यामध्ये प्रत्येकी तीन लेनचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी रस्ताही ठेवला जाणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे .
पुणे-सातारा आणि सातारा-पुणे कडील प्रवासासाठी या बोगद्यातून लागणारा प्रत्येकी ४५ मिनिटे आणि १० ते १५ मिनिटांच्या वेळेत घट होवून केवळ ५ ते १० मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. ६. ४३ कि. मी. लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे ९२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.
चौकट
कर्दनकाळ वळण निघणार
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस वळणाचा धोका काढण्यासाठी सुधारित रस्त्याचे काम सुरु आहे . शेकडो प्रवाशांचा बळी घेणारे हे वळण निघणार असल्यामुळे बोगदा पूर्ण झाल्यावर येथून दुहेरी वाहतुक सुरू होईल शिवाय रस्ता सरळ झाल्याने अपघातांची मालिका खंडित होईल