आपले सरकार सेवा केंद्रातील अपहार आकडा ५० लाखांवर !
By नितीन काळेल | Published: September 12, 2022 07:46 PM2022-09-12T19:46:30+5:302022-09-12T19:47:40+5:30
प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार?
सातारा : खटाव तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नावाने बनावट बँक बचत खाते काढून ४५ लाखांचा अपहार केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानंतर आता अन्य तालुक्यांतही अपहाराचा संशय असून एकूण आकडा ५० लाखांवर जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आहे. सातारा जिल्ह्यातही केंद्रे आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींनी केंद्र मोबदल्याची अग्रीम रक्कम जिल्हास्तरावरील खात्यात जमा करण्यासाठी २०१६ मध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मोबदला नावाने बँकेचे सातारा शहरात खाते उघडण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून २०२१-२२ या वर्षासाठी एकूण मागणीपैकी १२२६ ग्रामपंचायतींची अग्रीम मागणी १० कोटी ३१ लाख ८९ हजार ४२२ होती. त्यापैकी ९ कोटी ८७ लाख ४६ हजार ६६४ इतकी रक्कम ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरावरील बँक खात्यात वर्ग केलेली. परंतु ग्रामपंचायतींनी अग्रीम मागणीपेक्षा ४४ लाख ४२ हजार ७५८ रुपये कमी वर्ग केली. तसेच उर्वरित २६६ ग्रामपंचायतींची मागणी अग्रीम २ कोटी ४६ लाख २६ हजार २२९ रक्कम अद्यापही वर्ग नव्हती. त्यामुळे थकीत रकमेबाबत जिल्हास्तरावर बैठक झाली होती.
ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला त्यावेळी खटाव तालुक्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. तालुका व्यवस्थापकांनाही विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रक्कम वर्ग केल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर बँक स्क्रोलनुसार ताळमेळ घातल्यावर रक्कम जुळत नसल्याचे दिसून आले. सखोल माहिती घेतल्यावर खटाव तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने बनावट बचत खाते अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. तसेच व्यवहार पाहता तालुका व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत चौकशी समिती तयार केली. या समितीने तपासणी करुन अहवाल द्यायचा होता. आता ही समिती कार्यान्वित होऊन १५ दिवस होऊन गेले. तसेच या समितीलाही काही तालुक्यात किरकोळ का प्रमाणात असेना अपहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपले सरकार सेवा केंद्रातील घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. तसेच ४५ रुन ५० लाखांवर घोटाळ्याचा आकडा जाण्याची शक्यता आहे.
बनावट बँक बचत खाते काढून ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये सुमारे ४५ लाखांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी खटाव तालुक्यात समोर आले आहे. आता जिल्ह्यात आणखी कोठे गैरव्यवहार झाला आहे का? यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. काही ठिकाणी १० ते १५ हजारांपर्यंतचा अपहार दिसून आला आहे. समितीचा अंतरिम अहवाल दोन दिवसात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
विनय गौडा,
मुख्य कार्यकारी अधिकारी