सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला, १४ तासांहून अधिक वेळाने बाहेर काढले; अन्
By दत्ता यादव | Published: August 6, 2022 02:03 PM2022-08-06T14:03:23+5:302022-08-06T14:04:01+5:30
दरीतून आवाज येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर नागरिकांनी थोडे दरीत उतरून पाहिले असता कोणीतरी व्यक्ती दरीत पडल्याचे निदर्शनास आले.
सातारा: येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून तब्बल दोनशे फूट दरीत पडून हणमंत जाधव (वय ६४, रा. दौंड, पुणे) हे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे १४ तासांहून अधिक वेळ ते दरीत पडून होते. आज, शनिवारी सकाळी शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यू टीमच्या जवानांनी त्यांना दरीतून बाहेर काढले. सुदैवाने त्यांचा जीव वाचविला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजिंक्यताऱ्यावर अनेकजण फिरण्यासाठी जातात. हणमंत जाधवही काल, शुक्रवारी सायंकाळी अजिंक्यताऱ्यावर गेले होते. त्यावेळी चालत असताना ते पाय घसरून दरीत पडले. अंधार असल्यामुळे ते रात्रभर दरीतच पडून राहिले.
आज, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास काहीजण अजिंक्यताऱ्यावर फिरण्यासाठी जात असताना दरीतून आवाज येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर नागरिकांनी थोडे दरीत उतरून पाहिले असता कोणीतरी व्यक्ती दरीत पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत शिवेंद्रसिंहराजे ट्रेकरच्या जवानांना नागरिकांनी तत्काळ माहिती दिली. जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. रोप बांधून जवान दरीत उतरले.
तब्बल १४ तासानंतर जाधव यांना दरीतून वर काढण्यात यश आले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाधव हे साताऱ्यात कोणासोबत आले होते. हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत.