विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे
By दीपक देशमुख | Published: February 24, 2024 03:42 PM2024-02-24T15:42:53+5:302024-02-24T15:43:11+5:30
मराठा समाजाने संयम बाळगावा
सातारा : मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही, असे काहीजण सांगत आहेत. परंतु, का टिकणार नाही, याची कारणे मात्र ते देत नाहीत. वास्तविक आरक्षण कसं टिकेल यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. हातात संधी होती, त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण मागतोय. या समाजाला आरक्षण देण्यासाठी चार लाख कर्मचाऱ्यांची टीम लावली. दिवसरात्र काम केले. सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली, ज्या त्रुटी सांगितल्या त्या पुर्ण दूर केल्या. अभ्यासपूर्ण सर्व्हेक्षणातून मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागसलेपण सिद्ध केले. यासाठी तज्ज्ञ लोकांनी मेहनत घेतली. मराठा समाजाच्या लढ्यास यश मिळाले आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या टिकेल, असाच निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ३८१ कोटी निधी दिला आहे. प्रतापगडाचे संवर्धन करून शिवकालीन प्रतागपड जसा होता तशाच प्रकारे जतन केले जाणार आहे. क्षेत्र महाबळेश्वरातही पर्यटनाचे प्रकल्प घेतले आहेत. या भागातील तरूण नोकरीसाठी बाहेर न जाता येथे त्यास नोकरी मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. उदयनराजे यांच्यावर प्रतापगडची जबाबदारी सोपवणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा समाजाने संयम बाळगावा
मनाेज जरांगे आजपासून आंदोलन करणार आहेत, याबाबत छेडले असता एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजासाठी सरकारने कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम केले आहे. यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने तेलंगणा हैद्राबादपर्यंत काम करत आहे. समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उर्वरित लोकांसाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांत मराठा समाजाला न्याय मिळेल. सरकार पूर्णपणे सकारात्मक असून मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
उदयनराजेंसाठी शब्द टाकणार काय ?
खा. उदयनराजें यांच्या उमेदवारीसाठी शब्द टाकणार, असे विचारले असता महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, सर्व तुमच्यासमोर कसे कसे सांगू असे म्हणत वेळ मारून नेली.