सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतील चित्र स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाच तर महायुतीकडून भाजप चार जागा लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 20:54 IST2024-10-28T20:53:26+5:302024-10-28T20:54:25+5:30
महायुतीकडून भाजप सर्वाधिक चार जागांवर लढत आहे.

सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतील चित्र स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाच तर महायुतीकडून भाजप चार जागा लढविणार
सातारा :सातारा जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वाधिक पाच जागा लढणार आहे. तर महायुतीकडून भाजप सर्वाधिक चार जागांवर लढत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना आणि उद्धवसेनेला प्रत्येकी दोन जागा, तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. काही अपक्ष आणि बंडखोरही या निवडणुकीत रंगत आणणार आहेत.
सातारा जिल्ह्यात कोणता पक्ष कोणासोबत लढणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोमवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर झालेले महायुतीचे कऱ्हाड उत्तरमधील उमेदवार मनोज घोरपडे यांनी अर्ज दाखल केला असून, महाविकास आघाडीचे वाईतून अरुणादेवी पिसाळ आणि माणमधून प्रभाकर घार्गे मंगळवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करतील. सर्वाधिक रंगतदार आणि उत्कंठावर्धक लढती या सातारा जिल्ह्यातून पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुढील जवळपास एक महिना प्रचार आणि सभांचा धुरळा उडणार आहे.
प्रमुख पक्षातील लढती
भाजप विरुद्ध उद्धवसेना - एका ठिकाणी - सातारा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष - दोन ठिकाणी - वाई, फलटण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध शिंदेसेना - एका ठिकाणी - कोरेगाव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध भाजप - दोन ठिकाणी - कऱ्हाड उत्तर आणि माण
शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना - एका ठिकाणी - पाटण
काँग्रेस विरुद्ध भाजप - एका ठिकाणी - कऱ्हाड दक्षिण