पावत्या फाडणाऱ्या हातात आले खोरं अन् पाटी, रस्त्यावरील मुजविले खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 02:20 PM2022-07-18T14:20:30+5:302022-07-18T14:21:04+5:30
पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी त्यात आदळून दुचाकीस्वार पडला. त्याचवेळी साताऱ्यातील वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार हे गस्त घालण्यासाठी तेथून निघाले होते. त्यावेळी नागरिकांनी ही बाब शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. शेलार यांनी वेळ न दडवता कर्मचाऱ्यांना बोलावून खड्डा मुजवून घेतला.
सातारा : साताऱ्यातील चौकाचौकात दबा धरून बसलेले अन् एखाद्या वाहनचालकाकडून चूक घडली की पोलीसदादांनी शिट्टी वाजविलीच म्हणून समजा. वाहनचालकांना थांबवून दंड घेऊन हातात पावती ठेवतात; पण याच हातांनी शनिवारी फावडे धरून रस्त्यातील खड्डा मुजविला. सातारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अशात शनिवारी साताऱ्यात पोवईनाक्याकडून सातारा पालिकेकडे जाण्याच्या मार्गावर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ मोठा खड्डा पडला होता. त्यातच सायंकाळी पाऊस पडत होता. पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी त्यात आदळून दुचाकीस्वार पडला.
त्याचवेळी साताऱ्यातील वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार हे गस्त घालण्यासाठी तेथून निघाले होते. त्यावेळी नागरिकांनी ही बाब शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. खड्डे मुजविणे पालिकेची जबाबदारी असली तरी शेलार यांनी वेळ न दडवता कर्मचाऱ्यांना बोलावून खड्डा मुजवून घेतला. कर्मचाऱ्यांनी फावडे, पाटी आणून शेजारीच पडलेली खड्डी आणून खड्डा मुजविला. त्यामुळे अनर्थ टळला.
सहायक पोलीस फौजदार महादेव खुडे, पोलीस नाईक महेश बनकर, पोलीस नाईक सोमनाथ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश नावडकर, योगेश जाधव यांनी खड्डा मुजविला.