वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका, कोयना धरणाचा पायथा वीजगृह पडला बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:46 AM2023-01-04T10:46:26+5:302023-01-04T10:49:42+5:30
४० मेगावॅट वीज निर्मिती ठप्प.
निलेश साळुंखे
कोयनानगर : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला आहे. पायथा गृहातून होणारी वीज निर्मिती ठप्प झाली असून वीज निर्मितीनंतर सिंचनासाठी सोडले जाणारे पाणीही बंद झाले आहे. सिंचनासाठी गरज भासल्यास बुधवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उघडले जाण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी तसेच ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षारक्षकांनी ७२ तासाचा संप पुकारला आहे. त्यामुळे तीन दिवस महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता मंगळवारी रात्रीपासून वर्तवली जात होती. वीज वितरणच्या खाजगीकरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. त्यातच महावितरणने महत्त्वपूर्ण माहिती देत संप असला तरी वीजपुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासित केले होते. मात्र, बुधवारी रात्रीच संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला. पायथा वीजगृहातून प्रति सेकंद ४० मेगावॕट वीजनिर्मिती करून २१०० क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाते.
मात्र संपामुळे बुधवारी रात्री नऊ वाजता पायथा वीजगृह बंद पडला. वीजगृहातून तयार होणारी ४० मेगावॕट वीज निर्मिती बंद झाली आहे. तसेच नदीपात्रात सोडले जाणारे २१०० क्युसेक्स पाणीही बंद करण्यात आले आहे. वीज निर्मिती बंद पडल्यामुळे त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यातच सिंचनासाठी धरणातून सोडले जाणारे पाणीही बंद झाल्याने नदीपात्राची पाणी पातळी कमी होणार आहे. सिंचनासाठी आवश्यकता भासल्यास धरणाचे वक्र दरवाजे उघडून बुधवारी दुपारनंतर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.