खून केला तरी पचवायची ताकद, महिला वनरक्षक मारहाण प्रकरणातील आरोपीची वल्गना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:56 PM2022-01-22T16:56:32+5:302022-01-22T16:56:53+5:30
वेळ पडली तर थेट मंत्रालयापर्यंत आपला वट आहे. आपलं कोणच काही बिघडवू शकत नाही!
सातारा : साताऱ्यात सर्विस करायची तर जानकर बरोबर सरळच राहावे लागते, मारामाऱ्या काय खून केला तरी पचवण्याची ताकद ठेवतो हा फकड्या... वेळ पडली तर थेट मंत्रालयापर्यंत आपला वट आहे. आपलं कोणच काही बिघडवू शकत नाही! यासह अनेक वल्गना करणारा रामचंद्र जानकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या नंतर त्याचे एकेक किस्से बाहेर येऊ लागले आहेत.
सज्जनगडापासून अवघ्या काही अंतरावर पळसावडे हे गाव आहे. या गावात वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर यांनी वनरक्षक सिंधू सानप यांना मारहाण केली. याठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना धाक दाखविण्याचा याचा कायम प्रयत्न असायचा. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, अर्वाच्च बोलणे बघून घेतो म्हणणे आणि आपण कोणाच्या बापाला भीत नाही अशा अविर्भावात कायम वावरणाऱ्या या रामचंद्राचे वेगळेच रामायण आता समोर येऊ लागले आहे.
पळसावडे या गावाची लोकसंख्याही शंभरच्या आत आहे. गावात लोकसंख्या कमी असल्याने जानकर याच्या विषयी तक्रार करायला कधीच कोणीच पुढे आले नाही. काही दिवस राजघराण्यात सेवा बजावल्यानंतर वर्तणुकीमुळे त्याची जलमंदिर आणि सुरुची या दोन्ही ठिकाणांहून हाकलपट्टी करण्यात आली होती.
गावाकडे याविषयी कोणालाच माहिती नसल्याने प्रत्येकाला हा राजघराण्याच्या संपर्कात असल्याचीच भावना होती. वेळ पडली तर पोपटपंची करून दोन्ही वाड्यावरील शिलेदारांच्या संपर्कात राहून आपलं काम करण्याची त्यांची हातोटी होती. राजकीय लोकांच्या नावाने स्वतःचे महत्व वाढवणाऱ्या जानकर याच्या त्रासाने सर्वजण त्रस्त झाले होते. सिंधू सानप यांच्या प्रकरणामुळे त्यांची मुजोरी कमी होईल अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी ''लोकमत''कडे नोंदविल्या.
म्हणे तुम्हाला काम बघून काय करायचंय
वनक्षेत्रात खुरपणी करण्यासाठी सुमारे ३० हजार रुपये मंजूर झाले होते. काम न करता हे बिल अदा व्हावे अशी जानकरची इच्छा होती. ''नोकरीसाठी आलाय गपगुमान नोकरी करा आपल्या गावाला जावा आम्ही केलेलं काम बघून तुम्हाला काय करायचंय'' असे म्हणूनही सिंधू यांनी विरोध केल्यानंतर रामचंद्र जानकरने स्थानिक महिलांना तेथे कामासाठी लावले. हे काम लवकर पूर्ण करून बिल काढून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न असतानाच वनक्षेत्रात प्राणी गणना करण्यासाठी आमच्या महिलांना का नेले याचा त्रास त्याला झाला. यातूनच त्याने सिंधू यांना मारहाण केल्याचे स्थानिक सांगतात.