सातारा जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्या शंभरीपार, चिकुनगुण्याचाही प्रादुर्भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:06 PM2022-08-10T17:06:54+5:302022-08-10T17:07:22+5:30

कोरोनाची लाट ओसरू लागली असली तरी दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुण्याचा प्रादुर्भाव वाढू लागला

The prevalence of dengue and chikungunya started increasing in Satara district | सातारा जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्या शंभरीपार, चिकुनगुण्याचाही प्रादुर्भाव वाढला

सातारा जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्या शंभरीपार, चिकुनगुण्याचाही प्रादुर्भाव वाढला

Next

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली असली तरी दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुण्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांचा ताप चांगलाच वाढला आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे ११० तर चिकुनगुुण्याचे तब्बल २८ रुग्ण आढळून आले असून, डेंग्यू बाधितांमध्ये सातारा तालुका आघाडीवर आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात साथरोगांत वाढ झाली आहे. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश लक्षणे आढळून आल्याने जिल्हा हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यू अळ्या नष्ट करण्याबरोबरच संशयित नागरिकांचे मलेरिया चाचणीसाठी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. अनेकांना जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला.

हिवताप विभागाच्या नोंदीनुसार आठ दिवसांत जिल्ह्यातील डेंग्यू बाधितांची संख्या ११० वर पोहोचली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच चिकुनगुण्याचे २८ रुग्ण असून, स्वाईन फ्लूचे रुग्ण देखील आढळून येत आहेत. डेंग्यू, चिकुनगुण्याचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, सर्व आरोग्य केंद्रांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

थोडी काळजी घ्या...

जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. घर व परिसराची नियमित स्वच्छता ठेवणे, घराजवळील पाण्याची डबकी बुजविणे, भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, भांड्यांमध्ये जास्त काळ पाणी भरून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, कोणताही आजार अंगावर न काढता रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन हिवताप विभागाकडून करण्यात आले आहे

तालुकानिहाय डेंग्यू रुग्ण
सातारा ७२, कऱ्हाड १२, वाई २, कोरेगाव ११, खटाव ९, खंडाळा १, पाटण १, जावळी १

Web Title: The prevalence of dengue and chikungunya started increasing in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.