सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त
By नितीन काळेल | Published: August 29, 2023 05:22 PM2023-08-29T17:22:40+5:302023-08-29T17:23:39+5:30
सातारा : जिल्ह्यात हळूहळू लम्पी बाधित पशुधनाचा आकडा वाढत चालला असून आता खटाव तालुक्यातही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे फलटण, ...
सातारा : जिल्ह्यात हळूहळू लम्पी बाधित पशुधनाचा आकडा वाढत चालला असून आता खटाव तालुक्यातही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे फलटण, कऱ्हाड, मान आणि कोरेगावसह पाच तालुक्यात लम्पी पोहाेचलाय. तर पशुसंवर्धन विभागाने ३ लाख ४२ हजार जनावरांना लसीकरण केले आहे. यामुळे ९७ टक्के लसीकरण करण्यात यश आलेले आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या आॅक्टोबर ते यंदाच्या मार्च महिन्यादरम्यान लम्पीच्या पहिल्या टप्प्यात बाधित पशुधनाचा आकडा मोठा होता. जवळपास २० हजारांहून अधिक पशुधनाला या रोगाने गाठले होते. तर १४८९ जनावरांचा मृत्यू झालेला. मात्र, मार्च महिन्यानंतर लम्पीचा धोका कमी झाला होता. यामुळे शेतकऱ्यांबरोबर प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला होता. चार महिने जिल्हा लम्पीपासून दूर राहिला.
पण, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पीचा कहर वाढलाय. सातारा शेजारील सोलापूर जिल्ह्यातही बाधित जनावरांचे प्रमाण आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यालाही धोका निर्माण झालेला. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने गोवंशीय जनावरांना लसीकरण सुरू केले आहे. ३ लाख ५२ हजार जनावरांना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार ५१८ पशुधनाला लस देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांनाही लवकरच लस देण्यात येणार आहे.
बाधित जनावरात ११ ने वाढ...
सातारा जिल्हा शेजारील सोलापूर जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केले आहेत. सातारा जिल्ह्यातील हळूहळू बाधित जनावरांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गोवंशीय जनावरांचे बाजार बंद केले आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीही होणार नाहीत. तर सोमवारपर्यंत जिल्ह्यात ४१ जनावरांना लम्पी झाल्याचे दिसून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. मंगळवारी लम्पी बाधित पशुधन संख्या ११ ने वाढून ५२ वर पोहोचली आहे.