झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:41 AM2023-10-20T11:41:13+5:302023-10-20T11:41:25+5:30

रस्त्यावरच ढीग; कॅरेट थेट कचरागाडीत

The prices of marigold flowers are low as they bloom before Dussehra | झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले 

झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले 

माणिक डोंगरे

मलकापूर : वातावरणातील बदलामुळे व पाऊस कमी आणि उष्णता वाढल्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताच्या अगोदरच बहरल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर गडगडले आहेत. किलोला २० रुपये दर मिळत नसल्याने रस्त्यावर ढीग लागले. नाईलाजास्तव क्रेट थेट कचरागाडीत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रस्त्यावर टाकलेले फुलांचे ढीग जेसीबीने गोळा करत झेंडूच्या फुलांना मुंबई मार्केटमध्ये थेट कचरागाडीची वाट दाखवली आहे.

मलकापुरातील शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकाकडे वळले आहेत. यावर्षी झेंडू उत्पादक शेजाऱ्यांना कमी पाऊस असल्यामुळे झेंडूच्या बागा जोपासणे सोपे झाले होते. फुलांना दसऱ्याला दर मिळेल व उत्पन्न वाढेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी झेंडूच्या रोपांची लागवण केली. माल बाजारात नेण्यापर्यंतच्या खर्चाचा विचार करता फुलांना दरवर्षी जेमतेम २० ते ८० रुपये प्रती किलो दर मिळत होता. दसरा दिवाळीला तर ग्राहक मिळवतानाही ओरडून घसा कोरडा करावा लागत होता. मात्र यावेळी पाऊस प्रमाणात असल्यामुळे फुलशेती चांगलीच बाहरली होती.

दसऱ्याऐवजी काही दिवस अगोदरच फुले विक्रीयोग्य झाली. फुलाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत उठाव होत नव्हता. शेतकऱ्यांना पुणे, मुंबईसह बेंगळुरूसारख्या मोठ्या बाजारपेठेत धाव घ्यावी लागली. फुले दसऱ्यापर्यंत टिकवणे कठीण झाले होते. परिणामी शेतकऱ्यांना लवकरच फुले तोडून बाजारात घेऊन जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत वाहने भरून गेले असता फुले घेण्यासाठी ग्राहकच मिळेना.

दरवर्षी शेतकऱ्यांच्या फुलांना घाऊक बाजारात किलोला ५० ते ६० रुपये दर मिळत असे. मात्र यावर्षी २० रुपये सुद्धा दर देण्यास कोणी तयार होत नाही. एक-दोन दिवसातच फुले खराब झाल्याने क्रेट थेट कचरागाडीतच ओतावे लागले. तर काही शेतकऱ्यांनी बाजारतळातच फुलाचे ढीग आहे, तसेच सोडून यावे लागले. संबंधित बाजार समिती प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने फुलाचे ढीग कचरा गाडीत भरले. अशा अवस्थेमुळे फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक व उत्पादन खर्चही न आल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांच्या बागा केल्या. पावसाने उघडीप दिली. दसऱ्याला फुले विक्रीयोग्य होतील, असे वाटत होते. मात्र वातावरणातील बदलामुळे लवकर फुले विक्रीयोग्य झाली. त्यामुळे फुलांची आवक वाढली. मुंबईच्या मार्केटमध्ये दर मिळेल या आशेने गेलो. मात्र तेथेही निराशाच झाली. अनेक शेतकऱ्यांना फुले कचऱ्यात टाकावी लागली. - अशोकराव पाचुंदकर, झेंडू उत्पादक शेतकरी.
 

Web Title: The prices of marigold flowers are low as they bloom before Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.