साताऱ्यात थकबाकीदाराची मालमत्ता पालिकेकडून सील, आतापर्यंत 'इतक्या' कोटींचा महसूल जमा
By सचिन काकडे | Published: March 27, 2024 07:01 PM2024-03-27T19:01:19+5:302024-03-27T19:02:48+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई मोहीम तीव्र केली असून, बुधवारी दुपारी करंजे पेठ येथील एका थकबाकीदाराची ...
सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई मोहीम तीव्र केली असून, बुधवारी दुपारी करंजे पेठ येथील एका थकबाकीदाराची मालमत्ता सील करण्यात आली. शिरीष कुलकर्णी असे कारवाई करण्यात आलेल्या थकबाकीदाराचे नाव आहे.
सातारा पालिकेला यंदा चालू कर व थकबाकी मिळून ३७ कोटी ४१ लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. यापैकी पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत २६ कोटी ६० लाखांचा महसूल जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस उरले असून, पालिकेला आणखी १० कोटी ८१ लाखांचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. ते गाठण्यासाठी वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली आहे. करंजे पेठ येथील मिळकतदार शिरीष कुलकर्णी यांच्याकडे ६ लाख २७ हजार १८३ रुपयांची थकबाकी आहे.
वसुली विभागाने त्यांना नोटीस बजावून थकबाकी भरण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, या नोटिसीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने बुधवारी दुपारी जप्ती पथकाकडून कुलकर्णी यांची मालमत्ता सील करण्यात आली.
या कारवाईत वॉरंट अधिकारी अतुल दिसले, भाग लिपिक राजे भोसले, लिपिक जगदीश मुळे, राहुल आवळे यांनी सहभाग घेतला. थकबाकीदारांनी चालू कर व थकबाकी तातडीने जमा करुन कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.