सातारा अन् माढ्याचा तिढा निवडणूक घोषणेपूर्वी सुटणार?; बैठका, चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच
By नितीन काळेल | Published: March 8, 2024 06:55 PM2024-03-08T18:55:51+5:302024-03-08T18:56:16+5:30
महायुतीत दावे-प्रतिदावे: आघाडीत शरद पवार सबकुछ
सातारा : लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत असलीतरी सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवार अजून ठरलेले नाहीत. महायुतीत तर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यावरच उमेदवार ठरणार आहे. पण, बैठका, जागावाटप चर्चेचं सतत गुऱ्हाळ सुरूच असल्याने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीतरी उमेदवार ठरणार का ? याविषयी साशंकता आहे.
लोकसभेचे सातारा आणि माढा मतदारसंघ दरवेळी उमेदवारीवरुनच चर्चेत येतात. यातील सातारा हा सातारा जिल्ह्यातीलच सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनलेला आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील माण आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघाचा मिळून तयार झालेला आहे. २००९ पासूनच्या तीन निवडणुका या आघाडी आणि युतीत ज्या पक्षाकडे मतदारसंघ, त्यांच्यातीलच उमेदवार ठरुन लढल्या गेल्या. पण, गेल्या दीड वर्षातील राजकीय घडामोडीने मतदारसंघांबाबत तिडा निर्माण झालेला आहे.
तर महाविकास आघाडीत हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे राहणार आहेत. पण, महायुतीत अजून मतदारसंघ कोणाकडे जाणार हे स्पष्ट नाही. सातारा मतदारसंघावर तर युतीतून शिवसेनेचा पूर्वीपासून दावा होता. पण, तो राजकीय घडामोडीत मागे पडलाय. आता अजित पवार गटाने मतदारसंघ लढविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पक्षातील नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबरोबर बैठकही झाली. त्यामध्येही सातारा मतदारसंघाचा आग्रह धरण्यात आला.
अशातच आता ‘रिपाइं’ आठवले गटानेही दावा केलाय. तर भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले यांची तयारी पूर्ण झालेली आहे. पण, राष्ट्रवादीच्या ठाम भूमिकेमुळे मतदारसंघ कोणाकडे जाणार हे गणित सुटलेच नाही. अशातच आता अजित पवार गटाने माढा मतदारसंघावरही दावा ठोकलाय. वास्तविक माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे खासदार आहेत. भाजपकडून तेच दावेदार आहेत. पण, अजित पवार गटाचे व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा विरोध आहे. रामराजेंनी बंधू संजीवराजेंसाठी माढ्यावर हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. यामुळे महायुतीत माढा मतदारसंघ कोणाला जाणार याचा तिडा वाढलाय.
महाविकास आघाडीत सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढविणार आहे. पण, याठिकाणी उमेदवार स्पष्ट नाही. राष्ट्रवादी अंतर्गतच एकमेकांना विरोध करण्याचे काम सुरू झाले आहे. तर माढ्यात शरद पवार गटाकडे काही पर्याय आहेत. तरीही रासपचे महादेव जानकर यांना आघाडीत घेण्याची खेळी शरद पवार यांच्याकडून होऊ शकते. त्यामुळे आघाडीत राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार की नाही याविषयीही अजून स्पष्टता नाही. त्यामुळे सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवार अजून स्पष्ट झालेले नाहीत. उलट तिडा वाढतच चालला असल्याचे दिसत आहे.
उमेदवारावर लढत काट्याची की मताधिक्क्याची ठरणार..
सातारा आणि माढा मतदारसंघातही आघाडी आणि युतीचे उमेदवार कोण यावरच लढत काट्याची का मताधिक्क्याची ठरणार हे समजणार आहे. तरीही साताऱ्यात शरद पवार गटाचा उमेदवार हा तगडा असणार हे स्पष्ट होत आहे. तो पक्षातील किंवा बाहेरुन आलेला असेल हे लवकरच समजेल. तर युतीत सातारा मतदारसंघ कोणाकडे हेच स्पष्ट नाही. त्यामुळे अंदाज बांधणे अवघड झाले आहे. माढ्यातही रंगतदार सामना होऊ शकतो. भाजपला मतदारसंघ गेल्यास रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुन्हा रिंगणात असणार आहेत. पण, त्यांच्या विरोधात ‘रासप’चे महादेव जानकर असल्यास तुल्यबळ लढत होऊ शकते. जर जानकर महाविकास आघाडीत न गेल्यास माढ्यात शरद पवार गटाचाही उमेदवार राहणार आहे. त्यामुळे महायुती, आघाडी आणि रासपमध्ये सामना होऊ शकतो.