पाऊस पुन्हा वाढला; नवजाला ५५ मिलीमीटरची नोंद!
By नितीन काळेल | Published: July 11, 2024 08:40 PM2024-07-11T20:40:11+5:302024-07-11T20:41:52+5:30
साताऱ्यात उघडीप कायम : कोयना धरणात ३३ टीएमसीवर पाणीसाठा
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेला पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ५५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे ३० आणि महाबळेश्वरला २२ मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही ३३ टीएमसीवर पोहोचला आहे. तर सातारा शहरात पावसाची उघडीप कायम आहे.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. आतापर्यंत बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. तसेच भात लागणही जोरात सुरू आहे. त्यातच जुलै महिना सुरू झाल्यापासून पाऊस वाढला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी जोर कमी झाला होता. पण, बुधवारपासून पुन्हा पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ५५ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ७६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे आतापर्यंत १ हजार ५९३ तर महाबळेश्वरला १ हजार ३७४ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच तीन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रातही जोर कमी होता. त्यामुळे कोयना धरणातील आवक कमी झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ६ हजार ६२० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ३३.०३ टीएमसी झालेला. धरण भरण्यासाठी अजूनही सुमारे ७२ टीएमसी पाण्याची गरज आहे.
सातारा शहरात चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर सातारकरांना सूर्यदर्शनही झाले. तर माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा आदी तालुक्यात पावसाची उघडीप आहे. कधीतरी एखादी सर येऊन कोसळत आहे.
धोम, कण्हेर, तारळी धरणक्षेत्रात पावसाची पाठ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख आणि मोठे सहा पाणीप्रकल्प आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची पाठ असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढत नाही. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणक्षेत्रातच ३० मिलीमीटर पाऊस झाला. तर बलकवडी २ आणि उरमोडी धरणक्षेत्रात १२ मिलीमीटरची नोंद झाली. पण, धोम, कण्हेर आणि तारळी धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत काहीही पाऊस झालेला नाही.