कोयनामाई पार करीत सावित्रींच्या लेकी घेताहेत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 06:47 PM2022-01-20T18:47:27+5:302022-01-20T18:53:32+5:30
आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी येथील मुलींनी हे शिवधनुष्य पेलले
सागर चव्हाण
पेट्री : शिक्षण क्षेत्रात आज आमूलाग्र बदल होत आहे. विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मात्र, जावळी तालुक्यातील दुर्गम खिरखंडी भाग अजूनही या सुविधांपासून वंचित आहे. असे असले तरी येथील सावित्रीच्या लेकी बोटीचे सारथ्य करीत व कोयनामाई पार करून शिक्षण घेत आहेत.
दुर्गम बामणोली भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात कोयना नदीच्या पलीकडे वसलेलं गाव म्हणजे खिरखंडी. या गावासाठी रस्ता ही गोष्टच अस्तित्वात नसल्यामुळे जगाशी संपर्क होतो ते केवळ बोटीतून. गावात पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पूर्वी वस्तीशाळा होती. शासनाच्या वस्तीशाळा योजनेतून २००१ साली गावाला शाळा आली. शिक्षक शंकर भोसले यांनी कठोर मेहनत घेऊन शाळा नावारूपाला आणून शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा मिळवून दिला.
प्राथमिक शिक्षणाची सोय झाली तरी सहावीनंतर काय हा प्रश्न होताच. पुढील शिक्षण घ्यायचं तर कोयना जलाशयातून प्रवास करावा लागतो. आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी येथील मुलींनी हे शिवधनुष्य पेलले. या गावातील मुली रोज बोटीचे सारथ्य करीत गावापासून कोसो दूर असलेल्या अंधारी गावात येऊन आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत.
एवढेच नव्हे, तर बोटीतून उतरल्यानंतर त्यांना कासजवळच्या अंधारी गावात डोंगरकपारीतून, जंगली श्वापदांच्या मार्गातून पायपीट करून शाळा गाठावी लागले. अनेक संकटांवर मात करीत सावित्रीच्या लेकी रोजच हे दिव्य पार करीत आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या या शाळेत प्राचार्य गंगाराम पडगे, प्राध्यापक विनायक पवार, प्राध्यापिका प्रियांका पडगे व शिक्षक नि:स्वार्थ भावनेने सेवा करीत आहेत.
शाळेसाठीची धडपड वाखाणण्याजोगी
शेंबडी गावातून अंधारीपर्यंत दऱ्या-खोऱ्यांतून चालत येणे, पुन्हा चालत जाणे या दिनक्रमात मुलींचा कधीही खंड पडत नाही. उलट दुसऱ्या दिवशी देखील त्या त्याच उत्साहाने शाळेत येतात. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेली मुलींचीही धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.