ऊसदराची बैठक निष्फळ; साताऱ्यातील कारखानदार म्हणतात ३१००, संघटना ३५०० वर ठाम
By नितीन काळेल | Published: November 30, 2023 03:38 PM2023-11-30T15:38:15+5:302023-11-30T15:39:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाम भूमिका : गनिमी कावा अन् साखर अडविणार; शेतकरी संघटना एकत्र
सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊसदराबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेतल्याने कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ३१०० रुपये दर जाहीर केला. पण, शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता ३५०० रुपयेच देण्याचीच आक्रमक भूमिका ठेवली. यामुळे तोडगा निघालाच नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आता कारखानदारांना लवकर निर्णय घेण्याची सूचना केली असून संघटनांनी मात्र, एकत्र येत दोन दिवसानंतर गनिमी काव्याने आंदोलन आणि साखर अडविण्याचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तिडा संपला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार काय भाव देणार याकडे लक्ष लागलेले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी रघुनाथदादा पाटील, पंजाबराव पाटील, राजू शेळके, विकास जाधव, मधुकर जाधव, देवानंद पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींकडून दर जाहीर होत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी डुडी यांनी जागेवरच दर जाहीर कारखान्यासाठी प्रतिनिधींना सूचना केली. यावर सर्वांनी एक होत यावर्षी उसाला प्रति टन पहिला हप्ता ३१०० रुपये दर देण्याचे जाहीर केले. पण, यावर शेतकरी संघटनांचे समाधान झाले नाही. त्यांनी बळीराजा अडचणीत आहे. साखरेला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळालाच पाहिजे, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली.
तसेच गेल्यावर्षी तोडणी झालेल्या उसालाही टनामागे पैसे देण्याची मागणी करण्यात आली. पण, यावर चर्चा होऊन काहीच निर्णय झाला नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारखानदारांना काही सूचनाही केली. सायंकाळपर्यंतच दराचा निर्णय घेण्याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची बैठक निष्फळ ठरली.
दरम्यान, बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळालेच पाहिजे, मागील तोडलेल्या उसाला पैसे मिळावेत यासाठी कारखानदारांना दोन दिवसांची मुदत देत आहे. या दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास गनिमी काव्याने आंदोलन करु. ऊस वाहतूक वाहने रोखण्याबरोबरच रास्ता रोको करु असा इशाराही दिला.
रघुनाथदादा म्हणाले पाच हजार दर..
या बैठकीला रघुनाथदादा पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये द्या, नाहीतर दोन कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा अशी मागणी केली. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास कारखान्यातील साखर अडविण्याचा इशाराही दिला.
जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. तर दुसरीकडे साखरेला चांगला दर मिळत आहे. पण, साखर कारखानदार शेतकऱ्यांना चांगला दर देण्यास तयार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार समाधानकारक दर देऊ शकतात. मग, जिल्ह्यातील कारखानदारांना काय होते. आता दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी गनिमी काव्याने निर्णायक आणि अंतिम लढा देऊ. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना