Satara: अखेर 'आले' खरेदीवर तोडगा निघाला, प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:29 PM2024-06-24T12:29:44+5:302024-06-24T12:30:00+5:30
अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्याचे आवाहन
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी सातारा बाजार समितीने रविवारी व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक आयोजित केली. बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. व्यापाऱ्यांकडून नवीन व जुन्या आल्याच्या दरात मोठी तफावत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांनी आले खरेदीनंतर ३० टनापर्यंत गाडी भरण्याची वाट न पाहता १२ टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, जेणेकरून तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
बैठकीत खरेदीदार व्यापाऱ्यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मान्य केले. शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले शेतमाल बाजार समितीतील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावा. व्यापाऱ्याने सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले.
अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्याचे आवाहन
बाजार समितीचा परवाना नसलेल्या काही जणांकडून सौद्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत व्यापाऱ्यांना शेतमाल विकण्याचे आवाहन सभापती विक्रम पवार यांनी केले आहे. परवानाधारक नसणाऱ्यांना शेतमाल विक्री केल्यास झालेल्या फसवणुकीला बाजार समिती जबाबदार राहणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.