Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड

By दीपक शिंदे | Published: February 5, 2024 12:48 PM2024-02-05T12:48:33+5:302024-02-05T12:48:42+5:30

ओढ्यावर फुटल्याने शेतजमिनीचे नुकसान टळले

The right canal of Dhom dam in Vajwadi in Satara district burst into the bottom | Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड

Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड

वाई : धोम धरणाच्या उजव्या कालव्याला व्याजवाडी हद्दीत पहाटे चार वाजता भगदाड पडल्याने शेकडो क्युसेक पाणी वाहून गेले. कालवा ओढ्यावर फुटल्याने शेती वाहून जाण्याचे मोठे नुकसान टाळले. यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येणार आहे. धोम धरण पाटबंधारे विभागाने वेळीच कालवा दुरुस्त केला असता तर ही दुर्घटना टळली असती. रात्री कालवा फुटण्याच्या घटनेने ओढ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.

कालवा फुटण्याच्या घटनांनी पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवर्तनाचा कालावधी संपल्याने रब्बी हंगामातील पिकांना थोडे दिवस पाणी देण्याची गरज नाही. दोन महिने कालव्यातून दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पहाटे चार वाजता कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तसेच ओढ्यावरील कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान झाले नाही. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. उसाची लागवड, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना सध्या पाण्याची गरज असल्याने कालव्यातून पाणी सोडले होते. 

परंतु पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे धोम धरणाच्या दोन्ही कालव्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. धरणातून पाणी सोडल्यास शेतात कमी ओढ्यातून जास्त वाहून जाते. यामुळे संबंधित विभागाला गळतीमुळे लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. वाई परिसरात अकरा किलोमीटर उजवा आणि डावा कालवा आहे. कालव्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. कालव्याची दुरुस्ती व पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास पाटबंधारे खात्याला नुकसान सहन करावे लागणार नाही.

कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या दरबारी पाटबंधारे खात्याचे संबंधित अधिकारी निधीचा पाठपुरावा करीत आहेत. परंतु कृष्णा खोऱ्याच्या जलसिंचन विभागाकडून उदासीनता असल्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळताना अडचणी निर्माण होत असल्याने पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे. शासनाने निधीची कमतरता भासू देणार नाही अशा वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून धोम धरणाच्या कालव्यासाठी निधीची तरतूद करावी जेणेकरून पुढील तीन ते चार महिन्यांत पाण्याच्या टंचाईचा सामना करताना अडचणी येणार नाहीत.

जिल्ह्यातून पाच तालुक्यांतील हजारो एकर जमीन या कालव्यावर अवलंबून आहे, तरी आमदार मकरंद पाटील यांनी संसदेत हा प्रश्न मांडून पाटबंधारे खात्याला निधी उपलब्ध करून द्यावा व त्वरित कालवा दुरुस्त करून चालू हंगामाचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले असले तरीही दुपारी तीनपर्यंत पाणी ओढ्यात वाहून जात होते. दोन महिन्यांत दोन मोठ्या घटना घडल्याने संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहू शकते. वाई तालुक्यात दुष्काळ गडद होणार यात शंका नाही.

ओढ्यांची तपासणी करून अहवाल करावा

गेल्या दोन महिन्यांत ओढ्यावरील कालव्यावर मोठ्या दोन घटना घडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ओढ्यावर कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. परंतु रब्बी हंगामाच्या तोंडावर कालवा फुटल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. प्रत्येक वेळी ओढ्यावरच कालव्याला भगदाड पडत असेल तर धोम धरणापासून अकरा किलोमीटर अंतरात कालवे किती ओढ्यावरून गेले आहेत याचा सर्व्हे करून दुरुस्तीचा प्रथम दर्शनी विचार व्हावा. तरच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यात यश मिळेल.

Web Title: The right canal of Dhom dam in Vajwadi in Satara district burst into the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.