धोकादायक इमारतीत घडतंय विद्यार्थ्यांचे भवितव्य, जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:43 PM2022-02-22T16:43:20+5:302022-02-22T16:43:52+5:30
तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छताखाली शिक्षणाचे जीवघेणे धडे गिरवले जात आहेत.
दशरद ननावरे
खंडाळा : शिक्षण हा बालकांचा हक्क आहे. प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी गावोगावी खेडोपाड्यात शाळा बांधण्यात आल्या आहेत. मात्र, खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील ननावरेमळा वस्तीवरील शाळेची इमारत धोकादायक असताना त्याच इमारतीखाली मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यावर जिल्हा परिषदेने तातडीने उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
ननावरेमळा शाळेत पहिली ते चौथीचे प्राथमिक वर्ग आहेत. दोन वर्गखोल्या असलेल्या या शाळेत सुमारे ३० ते ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, येथील दोन्ही वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छताखाली शिक्षणाचे जीवघेणे धडे गिरवले जात आहेत. या दोन्ही इमारती धोकादायक असल्याने शाळेने त्या पाडण्यासाठी निर्लेखन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. मात्र, सहा महिन्यानंतरही अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही.
त्यामुळे याच वर्गखोल्यातून मुलांचे शिक्षण सुरू आहे. वास्तविक, शाळेच्या चारही भिंती खराब झाल्या आहेत. फरशी उखडली आहे. इमारतीचे छताचे तुकडे पडत आहेत तर इमारतीचे खांब निकामी झाल्याने केवळ सळईचा आधार उरला आहे. अशा स्थितीत मुलांच्या जीविताचा विचार करून खोल्या पाडणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
शाळेच्या दोन्ही खोल्या धोकादायक आहेत. त्या तातडीने पाडल्या पाहिजेत. नवीन वर्गखोल्या बांधेपर्यंत मुलांची इतरत्र सोय करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, प्रशासनाने निर्लेखन प्रस्तावास मंजुरी देणे गरजेचे आहे. तसेच नवीन खोल्या बांधणे आवश्यक आहे. - नामदेव ननावरे, अध्यक्ष शाळा समिती
वर्ग : पहिली ते चौथी
खोल्या : २
विद्यार्थी : ३२