नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाउन’; लाडक्या बहिणींची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:38 PM2024-08-05T13:38:52+5:302024-08-05T13:43:38+5:30
अंगणवाडी सेविकांचे जागरण; ‘ओटीपी’साठी मध्यरात्री फोनाफोनी
संजय पाटील
कऱ्हाड (जि. सातारा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाइन भरण्याची सोय आहे. मात्र, ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे, तेच ॲप ‘सर्व्हर डाउन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. परिणामी, लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना जागरण करावे लागत आहे, तसेच ‘ओटीपी’साठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागत आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ‘नारीशक्ती’ ॲप उपलब्ध करून दिले. गत चार ते पाच दिवसांपासून मात्र ‘नारीशक्ती’ हे ॲप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे. ॲपवर ‘क्लिक’ करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येत आहेत. त्यासाठी सर्व कागदपत्रे सेविकांकडे जमा करायची असून, सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्रे सेविकांकडे सुपूर्द केली आहेत. मात्र, ॲप सुरूच होत नसल्याने सेविकांचीही पंचाईत झाली आहे.
रात्री अकरानंतर ‘ऑनलाइन’
नारीशक्ती दूत हे ॲप दिवसभरात सुरू होत नाही. काही वेळा रात्री अकरानंतर हे ‘ॲप’ चालते. त्यामुळे अंगणवाडी सेविका रात्री जागरण करून जेवढे अर्ज भरता येतील तेवढे अर्ज भरून घेत आहेत. मात्र, त्यासाठी अर्जदार महिलेला रात्री फोन करून तिच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ‘ओटीपी’ सेविकांना मागावा लागत आहे.
नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन सध्या तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनाही ऑनलाइन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. दिवसभर ॲप चालत नाही. रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे. - आनंदी अवघडे, राज्याध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू)