सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली 

By नितीन काळेल | Published: December 8, 2023 07:06 PM2023-12-08T19:06:26+5:302023-12-08T19:07:47+5:30

सातारा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ होत असून आता माणसांच्या बरोबरीने ...

The severity of drought increased in Satara district, along with humans, animals also became thirsty | सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली 

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली 

सातारा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ होत असून आता माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली आहेत. सध्या ६७ गावे आणि २६५ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून ६१ टॅंकरवर ९७ हजार नागरिक आणि ६९ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. यामुळे उन्हाळ्यातच टंचाईची स्थिती उद्भवलेली. पण, टंचाईग्रस्त गावांची संख्या जेमतेमच असायची. जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर टॅंकर बंद व्हायचे. पण, यंदा पावसाने जिल्ह्यावरच संकट निर्माण केलेले आहे. सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच बहुतांशी धरणेही भरलेली नाहीत. यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्याचबरोबर टंचाईची समस्या उग्र स्वरुप धारण करत आहे. आताच ६७ गावे आणि २६५ वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात भयावह स्थिती निर्माण होणार आहे.

माण तालुका दुष्काळी. या तालुक्यात यावर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यापासून सुरू असणारा टॅंकर अजून बंद झालेला नाही. सध्या ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. यासाठी ३५ टॅंकर सुरू करण्यात आले असून यावर सुमारे ४८ हजार नागरिक अवलंबून आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, माेगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हसतनपूर, पळशी, पिंपरी, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, ढाकणी, कारखेल, वाकी, संभूखेड, रांजणी, भालवडी, खुटबाव, मार्डी, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय.

खटाव तालुक्यातही टंचाई आहे. ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकर सुरू आहेत. यावर ४ हजार ८६९ नागरिक आणि २ हजार १४० पशुधन अवलंबून आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी या गावांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत.

फलटण तालुक्यातही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १० गावे आणि २८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२ हजार २३६ नागरिकांना टॅंकरचा आधार आहे. तालुक्यात सध्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगावमध्येही टंचाईत वाढ झालेली आहे. १९ गावांसाठी १४ टॅंकर सुरू असून त्यावर ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधन अवलंबून आहे. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, सिध्दाऱ्थनगर, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकरने पाणीपुरवठा होतोय. वाई तालुक्यात एका गावासाठीच टॅंकर सुरू आहे. 

जिल्ह्यातील खंडाळा, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात टॅंकर बंद आहेत. यावर्षी खंडाळा तालुक्यात उन्हाळ्यातही टॅंकर सुरू नव्हता. 

माणमध्ये माणसांपेक्षा जनावरे अधिक बाधित..

जिल्ह्यात टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच पशुधनालाही फटका बसत आहे. माण तालुक्यात ४८ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार आहे. पण, त्यापेक्षा अधिक म्हणजे ५३ हजार पशुधन टंचाईने बाधित आहे. यांनाही टॅंकरच्या पाण्याचाच आधार आहे. फलटणमध्ये ११ हजार जनावरे टॅंकरवर अवलंबून आहेत. त्याचबरोबरच सध्या ११ शासकीय आणि खासगी ५० असे मिळून ६१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. आगामी काळात टॅंकरच्या संख्येत वाढ होणार आहे. तर सध्या १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

Web Title: The severity of drought increased in Satara district, along with humans, animals also became thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.