..त्यामुळे शिंदे सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा घेतला निर्णय, पालकमंत्री शंभूराज देसाईंची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 05:24 PM2022-11-12T17:24:47+5:302022-11-12T17:25:24+5:30
शिवसेना पक्षप्रमुखांचा 'तो' निर्णय न पटणारा होता.
चाफळ : ‘सुरुवातीलाच भाजप-युतीचे सरकार असा फॉर्म्युला ठरलेला असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय न पटणारा होता. भविष्यात आमच्यावर घाला घालणारा निर्णय असल्यामुळेच माझ्यासह इतर आमदार, खासदारांनी शिंदे सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला,’ अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
माजगाव, ता. पाटण येथे चाफळ भागासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या चरेगाव-चाफळ-दाढोली रस्ता ते चाफळ फाटा ते गमेवाडी या रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण कामाचे भूमिपूजन व नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, बी. आर. पाटील, डी. वाय. पाटील, चंद्रकांत पाटील, राजाराम पाटील, संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे, प्रशांत पाटील, गोरख चव्हाण, अॅड. चंद्रकांत कुलकर्णी, प्रकाश नेवगे, राजेंद्र पाटील, उमेश पवार, सुरेश काटे उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाही तालुक्यातील १३० गावे व वाड्या-वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत. वीज, पाणी या मूलभूत सोयीही करण्यात आल्या आहेत. असाच विकास संपूर्ण जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे.’
कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ, विभागातील विविध गावचे सरपंच, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गोरख चव्हाण यांनी आभार मानले.