दुकानदार महिलेची चूक,..अन् मुलाची अन्ननलिकाच जळाली; साताऱ्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Published: January 28, 2023 03:57 PM2023-01-28T15:57:29+5:302023-01-28T16:01:52+5:30

दुकानदार महिलेविरोधात गुन्हा दाखल

The shopkeeper mistake and the child esophagus got burnt; Shocking incident in Satara | दुकानदार महिलेची चूक,..अन् मुलाची अन्ननलिकाच जळाली; साताऱ्यातील धक्कादायक घटना

दुकानदार महिलेची चूक,..अन् मुलाची अन्ननलिकाच जळाली; साताऱ्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext

सातारा : दुकानात गेलेल्या मुलाने खाऊचे पाकीट मागितले. परंतु दुकानात असलेल्या महिलेने खाऊच्या पाकिटाऐवजी 'ड्रेन इन्स्टा’ दिले. यातील पावडर मुलाने तोंडात घालून पाणी पिले. त्यामुळे काही क्षणातच मुलाची अन्ननलिकाच जळाली. साहिल तानाजी पवार (वय १२, रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

साहिलला धड आता बोलताही येत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील साबळेवाडी येथे दि. २६ रोजी दुपारी दोन वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल हा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सकाळी शाळेत गेला होता. दुपारी तो शाळेतून परत आला. त्यावेळी गावापासून जवळच रस्त्याच्याकडेला असलेल्या एका किराणा दुकानात तो गेला. त्यावेळी दुकानात एक महिला होती. त्या महिलेला त्याने खाऊचे पाकीट मागितले. त्यावेळी त्या महिलेने खाऊच्या पाकिटाऐवजी त्याच्या हातात वाॅश बेशीन स्वच्छ करण्यासाठी वापर करतात ते ‘ड्रेन इन्स्टा’ दिले. 

हे ड्रेन इन्स्टा घेऊन साहिल घरी गेला. त्यावेळी घरात कोणी नव्हते. त्याने ते पाकीट फोडून संपूर्ण पावडर तोंटात टाकली. त्याचवेळी त्याची जीभ चरचरली म्हणून त्याने एक ग्लास पाणी पिले. अॅसीडयुक्त असलेल्या या पावडरमुळे साहिलची अन्ननलिका जळाली. त्याने आरडाओरड केल्यानंतर त्याचे वडील आणि इतर लोक तेथे आले. त्यांनी साहिलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांपासून त्याला बोलता येत नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. मुलाची अशी अवस्था झालेली पाहून वडील तानाजी पवार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दुकानदार महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुनंदा शंकर साबळे (रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) या महिलेवर (व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे) या कलमान्वे गुन्हा दाखल केला.  

Web Title: The shopkeeper mistake and the child esophagus got burnt; Shocking incident in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.