"चार भिंती"कडे जाणारा पायरी मार्ग भेगाळला!
By सचिन काकडे | Published: September 17, 2023 09:22 PM2023-09-17T21:22:07+5:302023-09-17T21:22:35+5:30
चार भिंती हे ऐतिहासिक स्मारक असून, या वास्तूचे पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील चार भिंतीकडे जाणारा पायरी मार्ग भेगाळला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. एखादा अनर्थ घडण्यापूर्वी पालिकेने या पायरी मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चार भिंती हे ऐतिहासिक स्मारक असून, या वास्तूचे पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे. सातारा शहराचे विहंगम दृश्य या उंच टेकडीवरून दिसत असल्याने या ठिकाणाला भेट देणाऱ्या आबालवृद्धांची संख्या अलीकडे वाढू लागली आहे. मात्र, स्मारकाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा काही भाग भेगाळला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर पायरी मार्ग कोसळून पडलाच तर चार भिंती स्मारकाकडे जाण्याचा मार्गच बंद होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.