महाराणी येसूबाई यांची कर्तृत्वगाथा इतिहासात उपेक्षित, ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांची खंत 

By सचिन काकडे | Published: July 4, 2024 06:35 PM2024-07-04T18:35:32+5:302024-07-04T18:36:17+5:30

साताऱ्यात ‘आगमन शौर्य दिन’ साजरा

The story of Maharani Yesubai is neglected in history, The regret of senior history researcher Rajendra Ghadge | महाराणी येसूबाई यांची कर्तृत्वगाथा इतिहासात उपेक्षित, ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांची खंत 

महाराणी येसूबाई यांची कर्तृत्वगाथा इतिहासात उपेक्षित, ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांची खंत 

सातारा : ‘स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीरमरणानंतर जो मुत्सद्दीपणा दाखवला त्याला इतिहासात तोड नाही. छत्रपती राजाराम महाराज यांना जिंजीला पाठविण्यामध्ये येसूबाई यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या मुत्सद्देगिरीमुळे मुघल सम्राट औरंगजेबाला कधी स्वराज्य जिंकता आले नाही, मात्र येसूबाईंच्या कर्तृत्वगाथेवर इतिहासाने म्हणावा तसा प्रकाश टाकला नाही,’ अशी खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केली.

महाराणी येसूबाई यांचे ४ जुलै १७१९ रोजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर साताऱ्यात आगमन झाले होते. हा दिवस येसूबाईंच्या आगमनाचा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त गुरुवारी सकाळी संगम माहुली येथील येसूबाईंच्या समाधी परिसरामध्ये अभिवादन कार्यक्रम आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

राजेंद्र घाडगे पुढे म्हणाले, ‘येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या केवळ पत्नीच नव्हत्या तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या. ध्येयवादीपणा आणि राजकीय धुरंदरपणा हा त्यांच्यातील अंगभूत गुण होता. छत्रपती शिवरायांच्या आणि महाराणी जिजाऊ महाराजांच्या छायेमध्ये वावरत असताना त्यांनी स्वराज्याविषयीची निष्ठा आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचे सत्व अंगी बाणवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर स्वराज्याचा पुढील छत्रपती घडण्यासाठी त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवले. इतिहासामध्ये त्यांनी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला.

महाराणी येसूबाईंनी स्वराज्यासाठी केलेला त्या आजच्या पिढीला म्हणावा तसा माहीत नाही. याशिवाय मृत्यूच्या तिथी विषयी सुद्धा इतिहासामध्ये संभ्रमावस्था आहे. अत्यंत थोर कारकीर्द घडलेल्या येसूबाईंच्या जीवनाविषयी इतिहासामध्ये अत्यंत तुटपुंजी माहिती उपलब्ध व्हावी, हे दुर्दैवी आहे. त्यांची कर्तृत्वगाथा आणि त्यापासून आजच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी असे शौर्य दिन दरवर्षी साजरे करायला हवेत.

कार्यक्रमाच्या प्रारंभी येसूबाई यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा मंचचे निलेश पंडित, मुख्याध्यापक एस. पी. काटकर, माहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे, प्रकाश माने, मंगलसिंग मोहिते, पुजारी संकपाळ, एस. के. जाधव, जयंत देशपांडे, लीलाधरराजे भोसले, सुभाष राजेशिर्के, योगेश चौकवाले आदी उपस्थित होते.

Web Title: The story of Maharani Yesubai is neglected in history, The regret of senior history researcher Rajendra Ghadge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.