मिरजेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन!, स्वाक्षरी अन् इमारत पाहून चिमुकले हरखले
By सचिन काकडे | Published: November 7, 2023 06:45 PM2023-11-07T18:45:16+5:302023-11-07T18:46:35+5:30
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा नेमकी कशी असेल? त्यांची स्वाक्षरी जवळून पाहता येईल ...
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा नेमकी कशी असेल? त्यांची स्वाक्षरी जवळून पाहता येईल का? शाळा प्रवेश दिन म्हणजे काय असतं? असे अनेक प्रश्न त्या चिमुकल्यांना पडले होते. अखेर तो दिवस आला अन् मिरजेतील (जि. सांगली) त्या शाळकरी विद्यार्थ्यांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आपले पाऊल ठेवले. शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिनाचे महत्त्व जाणून घेतानाच बाबासाहेबांची स्वाक्षरी पाहून हे विद्यार्थी हरखून गेले.
७ नोव्हेंबर हा दिवस राज्यात शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर १९०० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे, यासाठी बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीला मूर्त रूप आले अन् २०१७ पासून राज्य सरकारने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवार, दि. ७ रोजी या शाळेत शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा झाला. या दिवसाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी मिरज येथील आदर्श शिक्षण मंदिराच्या तब्बल ८० विद्यार्थी व शिक्षकांनी मंगळवारी या शाळेला भेट दिली. राजेंद्र कांबळे यांनी शाळा प्रवेश दिनाचे महत्त्व सांगितले. तर ‘बार्टी’चे समतादूत विशाल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका स्नेहलता कुरणे नंदिनी काटकर, अश्विनी कोल्हापुरे, कमलाकर मिसाळ, स्वाती केरीपाळे, वृषाली वाटवे उपस्थित होते.
सही जवळून पाहता आली..
बाबासाहेबांनी ज्यावेळी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील जनरल रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच बाबासाहेबांची ही स्वाक्षरी जवळून पाहता आली. सही पाहताना प्रत्येकाचे चेहऱ्यावर कुतूहल दिसून आले. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली शाळेची पुरातन व तितकीच देखणी इमारत विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यात सामावून घेतली.