साताऱ्यात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन घेतले शेतीचे धडे
By प्रगती पाटील | Published: July 3, 2024 11:25 AM2024-07-03T11:25:31+5:302024-07-03T11:26:24+5:30
सातारा : कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून ...
सातारा : कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून पिकलेले अन्न वाया न घालविण्याची सवय लागणे यांची जाणीव मुलांना या वयातच होणे ही काळाची गरज ओळखून प्रतिवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेती व शेती संबंधित सर्व उत्पादन प्रक्रियांची माहिती विद्यालयाचे वतीने देण्यात आली.
राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात गेले अनेक वर्षे प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षण या संस्थेच्या उपक्रमाद्वारे इयत्ता पाचवीतील मुलांना फुलशेती, सहावीतील मुलांना आयुर्वेदिक वनस्पती लागवड, सातवीतील मुलांकडून गटशेती करुन घेतली जाते तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना रब्बी व खरीप हंगाम म्हणजे नेमके काय? या हंगामात घ्यावयाची पिके, पेरणीपूर्व मशागत, पेरणी, पेरणीपश्चात मशागत, देशी - विदेशी वाणांची बियाणे, ग्रामीण जीवन पध्दती, पशुधन यांविषयी माहिती दिली जाते.
यावेळी स्वतः शेतकरी असलेले शिक्षक एम. आर. जाधव, एन. ए. कांबळे व पी. एस. निंबाळकर यांनी लगतच्या परिसरातील शेतावरती नेऊन विद्यार्थ्यांशी पेरणीच्या अनुषंगाने सुसंवाद साधला. याप्रसंगी मुलांनी आडवी पेरणी, उभी पेरणी, मुख्य पीक, आंतरपीक, कोळपणी, खुरपणी ते मळणी व बियाणांच्या विविध जाती विषयी विचारलेल्या प्रश्नांना शिक्षकांनी समर्पक उत्तरे दिली.
स्थानिक जनतेचे राहणीमान, पशुधनाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, रासायनिक व जैविक/नैसर्गिक खते यांविषयीची माहितीही जाणून घेतली. प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षण या संस्थेच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सर्वांगीण दृष्ट्या सक्षम रितीने घडविण्यासाठी जे प्रयत्न विद्यालयाच्या माध्यमातून केले जात आहेत. त्याचा मुलांच्या भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईल असा विश्वास शाखाप्रमुख एस. एस. क्षिरसागर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.