दुचाकीस्वार घसरून ट्रकखाली गेले, सातारचे एसपी मदतीला धावले; दोघा तरुणांचा वाचला जीव
By दत्ता यादव | Published: November 25, 2023 07:23 PM2023-11-25T19:23:05+5:302023-11-25T19:27:26+5:30
सातारा: कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी ...
सातारा: कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवत संबंधित दुचाकीस्वारांना ट्रकखालून बाहेर काढून त्यांचा जीव वाचला. हा अपघात शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत आज, शनिवारी दुपारच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आटोपून पोलिस अधीक्षक समीर शेख हे साताऱ्याकडे यायला निघाले. शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील पिराच्या दर्गाजवळ ते आले असता त्यांच्या समोरच दुचाकीवरील दोघेजण अचानक ट्रकखाली घसरून पडले. यावेळी अधीक्षक शेख यांनी तातडीने गाडीतून खाली उतरून स्वत: मदत करण्यास सुरूवात केली. ट्रकखाली अडकलेल्या दोघा तरूणांना त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या जवान अंकूश यादव, संजय कांबळे, प्रल्हाद ढाकरे, आकाश निकम, शंकर गायकवाड यांच्या मदतीने ओढून बाहेर काढले.
खुद्द पोलिस अधीक्षकच अपघातग्रस्तांना मदत करत असल्याचे पाहून इतर काही जण मदतीसाठी धावून आले. अधीक्षक शेख यांनी जखमींची चौकशी केली असता ते सांगोला आणि बारामतीमधील असल्याची माहिती मिळाली. रोहित साहेबराव बिले (वय २३, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर), ओंकार दादासो गार्डी (२३, रा. बारामती, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांना ट्रकखालून काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.