धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढू!, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलकांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:05 PM2023-03-04T19:05:54+5:302023-03-04T19:06:28+5:30
जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही
नीलेश साळुंखे
कोयनानगर : प्रकल्पग्रस्तांचा लढा १९६२ पासून सुरू असून, छत्रपतींच्या मावळ्यांना लढणे माहिती आहे. प्रशासनाने हुलकावणी दिल्याने आज चौथ्या पिढी न्यायासाठी लढत आहे, या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात आम्ही सोबत असून, त्यांच्या प्रश्नावर खांद्याला खांदा लावून लढू,’ असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिले.
कोयनानगर येथील प्रकल्पग्रस्ताच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त करताना ते बोलत होते.
यावेळी सुरेश पाटील, गजानन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, राजाराम जाधव, आनंद ढमाल, परशुराम शिर्के, दाजी पाटील, बळीराम कदम, विनायक शेलार, संजय कांबळे, कमल कदम, अक्षय कदम, रामचंद्र कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
हर्षद कदम म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार वेळोवेळी बैठका घेत होते. डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून माहिती घेतली जात असे. मात्र आठ महिने झाले मुख्यमंत्री धरणग्रस्तांना वेळ देत नाही आता धरणग्रस्तांनी आक्रमकपणा धारण केला पाहिजे. इथल्या बेरोजगार तरुणांच्या मतावर लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्यांनी हे काम केले पाहिजे. देशात, राज्यात मोठमोठे प्रकल्प धरणग्रस्तांच्या त्यागातून उभे राहिले आहेत आता संघर्ष अटळ आहे, या लढाईत आम्ही सर्व शिवसैनिक धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.’
तालुकाप्रमुख सुरेश पाटील म्हणाले, ‘धरणग्रस्तांना आंदोलनाची वेळ यायला नको होती. आता आंदोलकांनी आक्रमक होऊन शासकीय कार्यालयांना टाळे ठोकल्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही. ठाकरे गट धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी कायम राहील.’ यावेळी गजानन कदम, श्रीपती माने यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.
फुकटचे श्रेय घेऊ नये...
धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा गाढा अभ्यास असणारे डॉ. भारत पाटणकर अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लढत आहेत, त्यांचे श्रेय आहे. मात्र कुणी फलकबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा उपरोधक टोला हर्षद कदम यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्यासाठी पत्र दिले. मात्र जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही. तसेच आता कोणाकडूनही आश्वासन नको कृती हवी. -सचिन कदम, संघटक, श्रमिक मुक्ती दल