थंडीची लाट; सातारा-महाबळेश्वरचा पारा ११ अंशापर्यंत घसरला, जनजीवनावर परिणाम
By नितीन काळेल | Published: January 25, 2024 03:35 PM2024-01-25T15:35:32+5:302024-01-25T15:36:49+5:30
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आलीहे असून सातारा आणि महाबळेश्वरचा पारा ११ अंशापर्यंत घसरला आहे. हा या ...
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आलीहे असून सातारा आणि महाबळेश्वरचा पारा ११ अंशापर्यंत घसरला आहे. हा या वर्षातील आतापर्यंतचा नीच्चांकी पारा ठरला आहे. त्यातच वातावरणात शीतलहर कायम असल्याने दिवसाही हुडहुडी भरुन येत असल्याने जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.
नोव्हेंबर महिना थंडीचा असतानाही जिल्ह्याचे किमान तापमान कायम १५ अंशावर राहिले. यामुळे थंडी जाणवलीच नाही. मात्र, डिसेंबर महिन्यांत थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ झाली. डिसेंबरच्या मध्यानंतर सातारा शहराचा पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. तर त्याचवेळी जागितक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरलाही १२ अंशापर्यंत किमान तापमान घसरले होते. यामुळे थंडीचा जोर दिसून आलेला. पण, दोन दिवसांतच थंडी गायब झाली. पुन्हा तापमानात वाढ होत गेली. साताऱ्याचा पारा २० अंशापर्यंत पोहोचलेला. मात्र, जानेवारी महिना उजाडताच थंडीला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली.
देशाच्या उत्तर भागातील हरियाणा, पंजाब, उत्तराखंड भागात कडाक्याची थंडी पडत आहे. तसेच उत्तरेत बर्फवृष्टीही होऊ लागली आहे. याच्या परिणामाने महाराष्ट्रातही थंडीची लाट आलेली आहे. सातारा जिल्ह्यात तर मागील १५ दिवसांपासून थंडीची तीव्रता जाणवत आहे. किमान तापमानात उतार येत चालला आहे. त्यातच वातावरणात शीतलहर असल्याने दिवसाही थंडी झोंबत असल्याचे चित्र आहे. तर दोन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा आणखी घसरलाय. यामुळे जिल्हावासियांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत आहे. याचा परिणाम बाजारपेठेसह शेतीच्या कामावरही झाल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या सुमारास नागरिक घराबाहेर पडत नाहीत. तर शेतकरी दुपारच्या सुमारास शेतीची कामे करत आहेत.
सातारा शहराचा पारा आतापर्यंत १५ अंशाच्या दरम्यान राहत होता. मात्र, दोन दिवसांत तापमानात उतार आला आहे. गुरुवारी शहराचा पारा ११.३ अंश नोंद झाला. त्याचबरोबर महाबळेश्वरही गारठले आहे. महाबळेश्वरलाही ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली. सातारा आणि महाबळेश्वरमधील हा पारा आतापर्यंतचा नीच्चांकी ठरला. तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागातही कडाक्याची थंडी आहे. यामुळे गावोगावी शेकोट्या पेटल्या आहेत.
सातारा शहरात नोंद किमान तापमान..
दि. १० जानेवारी १८.१, ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १५, १६ जानेवारी १२.४, १७ जानेवारी १३, १८ जानेवारी १२, १९ जानेवारी ११.९, २० जानेवारी १४.६, दि. २१ जानेवारी १४, २२ जानेवारी १४.५, २३ जानेवारी १२, २४ जानेवारी १३ आणि दि. २५ जानेवारी ११.३