सातारकरांना दिलासा! थंडी पळाली; पारा १८ अंशांवर, यंदा दोन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:14 PM2023-01-27T13:14:53+5:302023-01-27T13:15:32+5:30
सातारा शहरातील पारा एकदमच घसरला
सातारा : सातारा शहरासाठी जानेवारी महिना गारठ्याचा ठरून दोन वर्षांतील नीचांकी तापमानाचीही नोंद झाली होती. पण, दोन दिवसांपासून थंडी पळाली असून, पारा १८ अंशांवर गेला आहे. त्यामुळे सातारकरांसाठी येथून पुढे कडाक्याची थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे.
सातारा शहरात मागील तीन महिन्यांपासून थंडी पडत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीव्रता कमी होती. दरवर्षीच डिसेंबरमध्ये सातारा शहराचे किमान तापमान १० अंशापर्यंत खाली येते. तसेच एखाद्या वर्षी शहराचा पारा ७ अंशापर्यंत घसरल्याचेही पाहायला मिळाले. पण, यावर्षी डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता नव्हती. मात्र, जानेवारी महिना उजाडल्यानंतर थंडीची तीव्रता वाढत गेली. जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत कडाक्याची थंडी सातारकरांनी अनुभवली. त्यावेळी १० जानेवारीला किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे दोन वर्षातील नीचांकी पाऱ्याची नोंद झाली होती.
त्यानंतर लागोपाठ चार दिवस साताऱ्याचे किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान राहिले. यामुळे सातारकरांची चांगलीच हालत झाली. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. त्याचबरोबर सकाळी फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली होती, असे असतानाच मागील चार दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. बुधवारी तर साताऱ्याचा पारा १८.०२ अंश नोंद झाला. यामुळे जानेवारी महिन्यात पारा प्रथमच १८ अंशावर गेल्याचेही समोर आले. तर येथून पुढे थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा शहरातील कमाल तापमानातही वाढ होत चालली आहे. ३१ अंशावर तापमान जात असल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवत आहे.
दरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरलाही कडाक्याची थंडी होती. त्यामुळे वेण्णालेकसह अन्य काही ठिकाणी दवबिंदू गोठण्याचे प्रकारही घडले होते. मात्र, आता महाबळेश्वरचा पाराही वाढला आहे. बुधवारी १४.०९ अंशाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वरलाही थंडी कमी झाल्याचे चित्र आहे.
सातारा शहरात नोंद किमान तापमान...
दि. १५ जानेवारी १२.०७, १६ जानेवारी १२.०७, १७ जानेवारी ११.०९, १८ जानेवारी १२. १९ जानेवारी १३.०१, दि. २० जानेवारी १३, २१ जानेवारी १३.०४, २२ जानेवारी १३.०३, २३ जानेवारी १३.०७. २४ जानेवारी १४.०५ आणि दि. २५ जानेवारी १८.०२
एका दिवसांत तीन अंशांचा उतार...
सातारा शहरातील पारा एकदमच घसरला आहे. एकाच दिवसात तीन अंशांनी घसरण झाली. यामुळे थंडीही एकदम कमी झाली आहे. त्यातच वारेही बंद असल्याने गारठा गायब झाल्याचे दिसून येत आहे.