सातारा ३८.९ अंश; नवीन वर्षातील उच्चांकी पारा
By नितीन काळेल | Published: March 26, 2024 07:21 PM2024-03-26T19:21:05+5:302024-03-26T19:21:18+5:30
सातारा : सातारा शहरात उन्हाळी झळा वाढल्या असून मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील ...
सातारा : सातारा शहरात उन्हाळी झळा वाढल्या असून मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. त्यामुळे सातारचा पारा लवकरच ४० अंशाचाही टप्पा पार करण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सातारा शहराचे उन्हाळ्यातील कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाते. तर बहुतांशीवेळा पारा हा ४० अंशाच्या आतच असतो. पण, यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्यदेव कोपू लागला आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातही प्रखर उष्णता जाणवू लागली आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. तर दुपारी १२ नंतर कडाक्याचे ऊन पडत जाते. परिणामी घराबाहेर पडणेही अवघड होऊन जात आहे. त्यातच मागील चार दिवसांत दररोज पारा वाढत गेला आहे. तीन दिवस तर सातारा शहराचे कमाल हे ३८ ते ३९ अंशादरम्यान राहिले आहे. मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील उच्चांकी पारा ठरला आहे.
सातारा शहर उन्हामुळे तापले असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर वाहतूकही कमी राहते. तसेच नागरिकही घरातच थांबणे पसंद करतात. त्यामुळे बाजारपेठेत तुरकळक प्रमाणात ग्राहक दिसून येतात. मात्र, सायंकाळी पाचनंतर नागरिक घराबाहेर पडून खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील पारा सातारा शहरापेक्षा अधिक नोंद होत आहे. यामुळे दुपारच्या सुमारास गावे ओस पडत असल्याचे चित्र आहे. तर ग्रामस्थ दुपारच्या सुमारास एखाद्या झाडाखाली थांबणे पसंद करत आहेत. त्याचबरोबर उन्हाच्या कडाक्यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे. सकाळी ११ पर्यंत आणि सायंकाळी चारनंतर शेतीची कामे उरकण्याकडे कल असतो.
सातारा शहरातील कमाल तापमान..
दि. १८ मार्च ३५.५, १९ मार्च ३६, २० मार्च ३५.८, दि. २१ मार्च ३६, २२ मार्च ३७, २३ मार्च ३७.२, दि. २४ मार्च ३८.५, २५ मार्च ३८.४ आणि दि.२६ मार्च ३८.९