सातारकरांना दिलासा!, वळवाचा गारवा, तापमानाचा पारा खालावला 

By नितीन काळेल | Published: May 25, 2024 07:24 PM2024-05-25T19:24:31+5:302024-05-25T19:24:56+5:30

उकाड्याने नागरिक झाले होते हैराण

The temperature in Satara dropped due to heavy rains | सातारकरांना दिलासा!, वळवाचा गारवा, तापमानाचा पारा खालावला 

सातारकरांना दिलासा!, वळवाचा गारवा, तापमानाचा पारा खालावला 

सातारा : दरवर्षीच कडक उन्हामुळे मे महिना तापदायक ठरतो. पण, यंदा वळवाच्या पावसाने धडाका लावल्याने पारा खालावला आहे. सातारा शहराचे तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे उन्हाळा असूनही मे महिना जिल्हावासीयांसाठीतरी सुसह्य ठरल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाळी झळा जाणवायला सुरूवात होते. सुरुवातीला कमाल तापमान ३५, ३६ अंशापर्यंत जाते. त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर पारा ४० अंशाचा टप्पा ओलांडतो. त्यामुळे एप्रिल आणि मे हे दोन महिने तापदायक ठरतात. कारण, पारा सतत वाढलेला असतो. परिणामी उन्हाच्या तीव्र झळा लागतात. अंगातून घामाच्या धारा लागतात. तसेच उकाड्याने हैराण होण्याची वेळ येते. पण, यावर्षी मे महिनातरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी चांगला गेला आहे.

यावर्षी जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा वाढला. कमाल तापमान ३९ अंशावर गेले होते. तर एप्रिल महिन्यात तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला होता. त्यातच सतत काही दिवस पारा ४० अंशावरही राहिल्याचे दिसून आले होते. यामुळे जिल्ह्यातील नागरिक तीव्र उकाड्याने हैराण झालेले. दिवसा तर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्याचबरोबर एप्रिलच्या शेवटच्या काही दिवसांत सातारा शहरातील पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला होता.

त्यामुळे शहरवासीयांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागले. तर मे महिन्याची सुरुवातही उच्चांकी तापमानाने ठरली. पहिले आठ दिवस पारा अधिक होता. त्यामुळे एप्रिलमधील पाऱ्याचा उच्चांक मोडला जाणार असे वाटत होते. पण, १० मे नंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले. तसेच वळवाचा पाऊसही पडू लागला. त्यामुळे पारा खालावला आहे.

मागील जवळपास १५ दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वळवाचा पाऊस होत आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. परिणामी उकाडाही कमी झाला आहे. सातारा शहरातील तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले आहे. त्याचबरोबर दुष्काळी माण, खटाव, फलटण या तालुक्यात मे महिन्यात कडाक्याचे ऊन असते. पण, सध्या वळीव पाऊस होत असल्याने तेथील पाराही घसरला आहे. यामुळे सर्वांनाच दिलासा मिळालेला आहे. तर लवकरच मान्सूनचा पाऊस सुरू होणार असल्याने तापमानात आणखी उतार येणार आहे.

सातारा शहरात नोंद कमाल तापमान असे..

दि. ५ मे ४०.७, ६ मे ४०, ७ मे ३९.१, ८ मे ३९.२, ९ मे ३९.२, १० मे ३६.७, दि. ११ मे ३८.२, १२ मे ३३.४, १३ मे ३६.७, १४ मे ३८.२, १५ मे ३६.७, १६ मे ३७.७, १७ मे ३६.९, दि. १८ मे ३८.५, १९ मे ३८.७, २० मे ३७.८, २१ मे ३८.४, २२ मे ३५.८, २३ मे ३७.२, २४ मे ३६.४ आणि दि. २५ मे ३२.६

Web Title: The temperature in Satara dropped due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.