सहाशे किमी पाठलाग करत पकडली ९३ लाखांची चोरी
By दत्ता यादव | Published: March 12, 2024 10:48 PM2024-03-12T22:48:55+5:302024-03-12T22:49:46+5:30
उत्तर प्रदेशातील दोघांना अटक; भुईंज पोलिसांची कारवाई.
सातारा : मुंबईहून गोव्याला निघालेल्या ट्रॅव्हल्समधून गोव्याच्या उद्योजकाची तब्बल ९३ लाखांची रोकड चोरीस गेली होती. या चोरीचा छडा भुईंज पोलिसांनी लावला असून, दिल्ली ते उत्तर प्रदेश, असा सहाशे किलोमीटरचा पाठलाग करून दोन आरोपींना भुईंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ८६ लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं.
हसन जुम्मन मोहम्मद (वय २२, रा. भवानीगड, महाराजगंज, जि. रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश), इस्तियाक जान मोहम्मद (२१, रा. पडरिया, महाराजगंज, जि. रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश), अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गाेव्यातील एका कंपनीचे मालक २२ फेब्रुवारी रोजी एका ट्रॅव्हल्सने मुंबईहून गोव्याला निघाले होते. रात्री साडेदहा वाजता ट्रॅव्हल्स महामार्गावरील बोपेगाव, ता. वाई येथील एका हाॅटेलसमोर थांबली होती. त्यावेळी संबंधित गोव्याचे उद्योजक जेवणासाठी खाली उतरले. हीच संधी साधून हसन आणि इस्तियाक या दोघांनी बसच्या क्लीनरशी संगनमत करून बॅगेतून ९३ लाखांची रोकड चोरून नेली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलिसांनी तपास सुरू केला.
घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले. चोरी केल्यानंतर एक संशयित उत्तर प्रदेश तर दुसरा दिल्लीला गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार भुईंज पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. हे पथक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर एक आरोपी दिल्लीतून उत्तर प्रदेशला रेल्वेने जात असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी त्याचा रेल्वेने तब्बल सहाशे किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. उत्तर प्रदेशच्या भवानीगडमधून हसन मोहम्मद याला तर त्याचा दुसरा साथीदार इस्तियाक मोहम्मदला रायबरेली जिल्ह्यातून अटक केली. या दोघांकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ८३ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. या दोघांना घेऊन पोलिसांचे पथक सुरक्षितरीत्या रोकडसह भुईंजमध्ये पोहोचले. या पथकाने केलेल्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांचे काैतुक केले.
भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, रत्नदीप भंडारे, अंमलदार वैभव टकले, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर आदींनी या कारवाईत भाग घेतला.
दहा लाखांच्या रकमेचे काय?
संशयित चोरट्यांनी ९३ लाखांची रोकड चोरून नेली. मात्र, त्यांच्याजवळ ८३ लाखांची रोकड सापडली. उर्वरित १० लाखांच्या रकमेचे त्यांनी काय केले, याचा पोलिस तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणातील बसचा क्लीनर फरार आहे. त्याच्याकडे उरलेली रक्कम आहे का, याचीही पोलिस चाैकशी करत आहेत.