Satara: जखिणवाडी येथील विहीरीत दोन बिबट्यांचा थरार, दोन तासात एक बिबट्या पिंजऱ्यात कैद
By दीपक शिंदे | Published: September 2, 2023 01:06 PM2023-09-02T13:06:04+5:302023-09-02T13:10:57+5:30
बिबट्याला बघायला नागरिकांची मोठी गर्दी
मलकापूर : जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांचा थरार पहायला मिळाला. या दोन बिबट्यांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर एका बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. जखिणवाडीच्या धनगरवाडा शिवारात सुखदेव येडगे यांच्या शेतातील विहिरीत ही घटना घडली.
जखिणवाडी ता. कऱ्हाड येथील आगाशिव डोंगरालगत धनगरवाडा नावाच्या शिवारात येडगे यांची शेती आहे. सुखदेव येडगे यांच्या शेतीत सिमेंट काँक्रीटने बांधलेली विहिर आहे. नेहमीप्रमाणे येडगे हे सकाळी राणात गेले असता बांधीव विहिरीत आवाज येत असल्यमुळे त्यांनी विहिरीकडे जाऊन बघितले असता दोन बिबटे पडले असल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची माहिती वनविभागासह ग्रामस्थांना दिली. वनअधिकारी तुषार नवले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या दोन्ही बिबट्यांना वाचवण्यासाठी वनविभागाने सकाळी दहा वाजता रेस्क्यू ऑपरेशनला सुरु केले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश मिळाले.
विहिरीत बिबटे पडल्याची खबर मिळताच अनेक ग्रामस्थांनी येडगे यांच्या शेताकडे धाव घेतली. बिबट्याला पाहण्यासाठी येडगे यांच्या शेतात मोठी गर्दी झाली होती.