रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या टायरने घेतला पेट, सैदापूरजवळ थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 05:45 PM2022-02-03T17:45:23+5:302022-02-03T17:45:44+5:30
ओगलेवाडी : सैदापूर ता. कऱ्हाड येथे विजापूरहून चिपळूणकडे निघालेल्या टँकरच्या मागच्या टायरला आग लागली. हा टँकर लोकांनी थांबवून आग ...
ओगलेवाडी : सैदापूर ता. कऱ्हाड येथे विजापूरहून चिपळूणकडे निघालेल्या टँकरच्या मागच्या टायरला आग लागली. हा टँकर लोकांनी थांबवून आग विझवण्यासाठी सहकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला. या टँकरमध्ये रसायनाने भरलेले असल्याने वेळीच आग विझवली नसती तर मोठी हानी झाली असती. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून वाहतूक इतर मार्गाने वळविली.
याबाबत माहिती अशी की, विजापूरहून चिपळूणकडे निघालेल्या टँकरला सैदापूर हद्दीत कृष्णा कालव्याजवळ आल्यानंतर अचानक आग लागली. ही आग टँकरच्या मागील चाकाजवळ लागल्याने चालकाच्या लक्षात आले नाही. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी हा टँकर पाहिल्यानंतर सतर्कता दाखवली. लोकांनी हा पेटता टँकर थांबवला आणि आग विजविण्यासाठी सहकार्य केले.
या टँकरमध्ये रसायन भरलेले होते. यामुळे वेळीच आग विझवली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. त्याची खबर लागताच कराड शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी तात्काळ हजर झाले. त्यांनी या मार्गावरील वाहतूक बनवडी मार्गे वळवली. या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बघ्यांची गर्दी मोठी झाली होती. परंतु नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने आणि योग्य मदत केल्याने आग विझवण्यात आणि पुढील अनर्थ टाळण्यात यशस्वी झाले.