Satara: फुलं पाहायला कासला निघालाय, हंगाम सुरू, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 05:38 PM2024-09-12T17:38:25+5:302024-09-12T17:39:17+5:30
सातारा : जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांचा राबता वाढला आहे. मात्र, हंगामाच्या बाबत ...
सातारा : जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांचा राबता वाढला आहे. मात्र, हंगामाच्या बाबत अवास्तव कल्पना घेऊन आलेल्या पर्यटकांमधून काहीसा नाराजीचा सूर समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. टिपेला गेलेला फुलांचा बहर डोळ्यात साठवून ठेवायचा असेल तर पर्यटकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.
पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर गेल्या काही दिवसांत कास पठारावर रानफुलांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. वनविभागाने कार्यकारी समितीच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांची सोय करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली. याबाबतचे वृत्त समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याने लांबून येणाऱ्या पर्यटकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पठाराचे बाजारीकरण व ‘कासचा हंगाम सुरू’ अशा मथळ्याखाली माहितीचा प्रसार झाल्याने आता फुलांचा गालिचा पाहायला मिळणार अशा अपेक्षेने पर्यटकांची रीघ पठाराकडे वळली. पठारावर सध्या एकूण बहराच्या ४० ते ५० टक्केच फुलोरा पाहायला मिळत आहे.
वस्तुस्थिती काय सांगते
जूनच्या पावसानंतर कास पठार हिरवाईने नटते. पाऊस थांबल्यानंतर उन्हाने पठार तापले की फुलांना बहर चढतो. सप्टेंबर अखेरीला पठार पूर्ण बहरात असते. हा बहर ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत दिसतो. सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने पठारावर रानहळदीची पांढरी फुले पाहायला मिळत आहेत.
फुलांना सुरुवात, पण बहर कमी!
वनविभागाने विकास पर्यटनासाठी सुरू केलेल्या अधिकृत www.kas.ind.in या वेबसाईटवर या संदर्भातील स्पष्ट चित्र मांडले आहे. ‘कास पठारावरील फुलांच्या बहरास सुरुवात झाली आहे. मात्र, फुलांचा बहर कमी आहे’ असे निवेदन वन विभागाने लाल अक्षरात वेबसाईटवर केले आहे.
कास पठारावर फुलांचा गालिचा असेल अशी अपेक्षा पर्यटकांनी करू नये. पठाराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे गालिचे पाहायला मिळतात. सप्टेंबर अखेरीस बहर पूर्ण फुललेला असेल, असा अंदाज आहे. - सुनील भोईटे, मानव वन्यजीव रक्षक