साताऱ्यात घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप!, ‘पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष
By सचिन काकडे | Published: September 5, 2022 07:03 PM2022-09-05T19:03:41+5:302022-09-05T19:04:22+5:30
सातारा : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशा भावना व्यक्त करत सोमवारी ...
सातारा : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशा भावना व्यक्त करत सोमवारी जिल्हावासीयांनी पाच दिवसांच्या घरगुती गणरायाला भक्तीपूर्ण निरोप दिला. सातारा शहरात पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात मूर्ती विसर्जन करून शाहूवासीयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवली.
विघ्नहर्ता गणेशाची यंदा घरोघरी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस रंगणाऱ्या भक्तीच्या या मेळ्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे. गणरायाची मनोभावे पूजा अर्चा करून सोमवारी पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांना व गौराईला नागरिकांनी निरोप दिला.
सातारा पालिकेकडून विसर्जनासाठी जलतरण तलावासह हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा व बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात सकाळी सात वाजल्यापासून नागरिक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सायंकाळी पाच नंतर शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने अवघी शाहूनगरी दुमदुमून गेली. मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी सातारकरांनी राजपथावर गर्दी केली होती.
पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सोहळा निर्विघ्न
जिल्हा पोलीस दलाकडून सातारा शहरात विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे मिरवणूक सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला.