ट्रक-ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वाचविला जीव
By दत्ता यादव | Published: December 2, 2022 12:02 AM2022-12-02T00:02:12+5:302022-12-02T00:03:37+5:30
१०८ रुग्णवाहिेकेवरील डाॅक्टरांची तत्परता; वर्धनगड घाटात ऊसाचा ट्रॅक्टर अन् ट्रकचा भीषण अपघात.
सातारा : अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका अवघ्या वीस मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. मात्र, जखमी ट्रक चालकाला केबीनमधून बाहेर काढणं अवघड होतं. जोरदार धडक झाल्याने ट्रक चालक आतमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत अडकला होता.
चालकाच्या पायातून सतत रक्तस्त्राव होऊ लागला. हा रक्तस्त्राव थांबविण्याबरोबरच त्याचा जीव वाचविण्याचे डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीतही डाॅक्टरांनी थेट ऊसाच्या कांड्याला सलाईन लावून आतमध्ये कसाबसा हात घालून जखमी चालकाला तासभर सलाईन लावले. त्यामुळेच त्या चालकाचा अखेर जीव वाचला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावरील वर्धनगड घाटात बुधवार, दि. ३० रोजी एक भीषण अपघात झाला. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या केबीनचा चक्काचूर झाला. त्यामध्ये ट्रक चालक संजय सुतार (रा. वेळू, ता. कोरेगाव) गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर १०८ रुग्णवाहिका पुसेगावहून अवघ्या वीस मिनिटांत तेथे पोहोचली. परंतु ट्रक चालक आतमध्येच अडकलेला दिसला. ऊसाच्या कांडक्या ट्रकच्या केबीनमध्ये घुसल्या होत्या. यामुळे चालक कुठे अडकला आहे, हे कोणाला दिसतही नव्हतंं. पोलिसांनी जेसीबी आणि क्रेन मागवून घेतली. परंतु ही दोन्ही वाहने येण्यास तासाचा अवधी होता. त्यामुळे मग रुग्णवाहिकेतील डाॅ. विकास शिंदे, रुग्णवाहिकेचे चालक वीरभद्र चव्हाण आणि १०८ चे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कदम यांनी चालकाला केबीनमध्येच सलाईन लावण्याचा निर्णय घेतला. परंतु ऊसाच्या कांड्यामुळे आतमध्ये जाता येत नव्हते. अशा परिस्थितीतही आतमध्ये हात घालून जखमी चालक संजय सुतार याला सलाईन लावले. त्याच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे तो बेशुद्धही होण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांनी अंत्यत समयसूचकतेने निर्णय घेऊन सलाईनमधून इंजेक्शन देण्यास सुरूवात केली. परिणामी चालक तब्बल तासभर शुद्धीवर राहण्यास मदत झाली.
तासाभरात क्रेन आल्यानंतर केबीनमधून ट्रक चालकाची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला ताडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू केल्यामुळे चालकाचा जीव वाचला. अशा प्रकारे जखमीचा जीव वाचविल्याने १०८रुग्ण वाहिकेच्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून काैतुक होत आहे.
उपचारासोबत धीरही दिला
ट्रक चालकाला केबीनमध्येच सलाईन लावण्यात आलं होतं. परंतु घटनास्थळी क्रेन येण्यास वेळ लागत असल्याने चालकही मनातून अस्वस्थ झाला होता. त्याला धीर देण्याचं कामही या १०८ रुग्ण वाहिकेवरील टीमनंकेलं. त्यामुळेच जखमी चालकाने उपचाराला प्रतिसाद दिला.