शिवाजीराजे भोसलेंवर संगम माहुलीत अंत्यसंस्कार, सातारकरांनी व्यवहार बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली
By सचिन काकडे | Published: September 14, 2022 06:44 PM2022-09-14T18:44:36+5:302022-09-14T18:47:47+5:30
राजघराण्याचे बारावे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने काल, मंगळवारी पुणे येथे झाले होते निधन
सातारा : राजघराण्याचे बारावे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय ७५) यांच्या निधनाने अवघा सातारा सुन्न झाला आहे. संगम माहुली येथील राजघाटावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तमाम सातारकरांनी बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने काल, मंगळवारी पुणे येथे निधन झाले. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अदालतवाडा या निवासस्थानी आणण्यात आले. बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या अनेक नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने अदालतवाडाही नि:शब्द झाला.
कन्या वृषालीराजे भोसले, शिवाजीराजे भोसले यांचे नातू कौस्तुभादित्य पवार, राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सत्यजितसिंह गायकवाड, वेदांतीकाराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजीत पाटणकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव, अमोल मोहिते, उद्योजक फरोख कूपर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजीराजे भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
दुपारी दीड वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून शिवाजीराजे भोसले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अदालतवाडा येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. ही अंत्ययात्रा अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, राजवाडा, राजपथ, पोवई नाका मार्गे संगम माहुली येथे नेण्यात आली. सातारा शहरात ठिकठिकाणी सातारकरांनी शिवाजीराजे भोसले यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वृषालीराजे भोसले यांच्या चिरंजीवाने दिला मुखाग्नी
संगम माऊली येथे राजघाटावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. प्रथेप्रमाणे राजघराण्यातील सर्व सदस्यांनी अंत्यदर्शन घेऊन दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. यानंतर वृषालीराजे भोसले यांचे चिरंजीव कौस्तुभआदित्य यांनी शिवाजीराजे यांना मुखाग्नी दिला. एक सच्चा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.