पोलिसांच्या ताब्यातून दुचाकी चोरटा पळाला
By दत्ता यादव | Published: December 31, 2023 08:58 AM2023-12-31T08:58:02+5:302023-12-31T08:59:12+5:30
ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कारागृहासमोर घडली.
सातारा : दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करून पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याला कारागृहात नेत असताना त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पलायन केले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कारागृहासमोर घडली.
सूरज हणमंत साळुंखे (वय २२, सावली, सातारा) असे पळून गेलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरी पोलिसांनी सूरज साळुंखे याला शनिवारी दुपारी दुचाकी चोरीप्रकरणात अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. सायंकाळी त्याला न्यायालयातून कारागृहात नेण्यात येत होते. कारागृहासमोर आणल्यानंरत त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी सोडल्या. त्यामुळे तो पोलिसांच्या हाताला हिसका मारून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. कारागृहासमोरूनच चोरटा पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने त्याला पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली आहेत. या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
‘तो’ पोलिसांच्या यादीवरील -
सूरज साळुंखे हा सराईत आहे. त्याच्या नावावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. बऱ्याचवेळा तो कारागृहात गेला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तो चोरी करत असे.