ग्रंथ चळवळ वाढीसाठी ग्रंथसंपदा कपाटांचे वाण! आदर्श विचारांची मुहूर्तमेढ
By प्रगती पाटील | Published: January 22, 2024 02:47 PM2024-01-22T14:47:50+5:302024-01-22T14:48:07+5:30
शाहूपुरी विद्यालयात अनोख्या पद्धतीने संक्रांतीचा सण
प्रगती जाधव पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने प्रत्येक वर्गासाठी एक अशा सहा छोटेखानी ग्रंथालयासाठी कपाटरुपी वाण लुटून एक आगळावेगळा मकर संक्रांतीचा सण साजरा केला. येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात नुकताच हा अनोखा उपक्रम पार पडला.
प्रा. डॉ. मिरा दीक्षित यांच्या सहकार्यातून गीता गोडबोले ट्रस्ट नागपूरचे अनिल गोडबोले व वृषाली गोडबोले यांनी विद्यालयांतर्गत ग्रंथालय मित्रपरिवार अधिक सक्षम होण्यासाठी व बालमित्रांमधील वाचन संस्कृतीला बळ मिळावे यासाठी सांगली येथील अजित लिमये यांनी ग्रंथसंपदेचे वाण गोडबोले यांच्यासह लुटून संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित केला.
अनिल गोडबोले यांनी विद्यालयांतर्गत कार्यरत असलेला ग्रंथालय मित्रपरिवार या उदात्त हेतूने प्रेरित होऊन काम करीत आहे ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. मिरा दीक्षित यांनी या अनुषंगाने बोलताना विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी भारत भोसले यांनी, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे भविष्य विचारांच्या पातळीवर घडविण्यासाठी म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी अनुक्रमे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, कवी कुसुमाग्रज, कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्रंथालय अशा एकूण सहा छोट्या - छोट्या ग्रंथालयांची निर्मिती विद्यालयांतर्गत करण्यात आली.
याप्रसंगी शालाप्रमुख एस. एस. क्षिरसागर, ग्रंथालय मित्रपरिवार प्रकल्प मुख्य समन्वयक अभय भोसले, एम. आर. जाधव, एस. एम. बारंगळे, एन. ए. कांबळे, पी. एस. निंबाळकर, सी. जी. देशमुख, डी. डी. कुचेकर, परशुराम भोसले, राजेंद्र सगरे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.