Satara: वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे जल सत्याग्रह आंदोलन, सरकार विरोधी तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:11 PM2024-09-27T15:11:28+5:302024-09-27T15:12:35+5:30
विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक
ढेबेवाडी/सणबूर : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणाच्या जलाशयात उतरून जल सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सरकार विरोधी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनाद्वारे धरणस्थळी देण्यात आला.
पालकमंत्री शंभूराज देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील विषयांवर प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने धरणस्थळी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून गुरुवारी धरणग्रस्तांनी जलाशयात उतरून सरकार विरोधी तीव्र आंदोलन उभारले.
यावेळी धरणग्रस्त संघटनेचे प्रमुख जितेंद्र पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. त्यावेळी तातडीने या मागण्यांबाबत हालचाली चालू करू असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, त्याच बैठकीत पंधरा दिवसांमध्ये ठोस निर्णय न झाल्यास धरणस्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाला दिलेली मुदत संपूनसुद्धा अजूनही धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे.
धरणग्रस्तांच्या मागण्या..
- कऱ्हाड, पाटण तालुक्यातील लाभ क्षेत्रात धरणग्रस्तांच्या नावे पसंती नसताना वाटप झालेल्या जमिनी रद्द करून त्यांच्या मागणीप्रमाणे पुनर्वसनाचा लाभ मिळावा.
- मेंढ येथील पुनर्वसन गावठाणमधील पाण्याचा व सुधारित गावठाणचा नकाशा या प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करावा.
- अनेक वर्ष प्रलंबित असणारी संकलन दुरुस्तीची प्रकरणे तत्काळ निकाली काढावी.
- जमीनऐवजी रोख रक्कम मंजूर असतानासुद्धा प्रांत कार्यालय पाटण यांच्याकडून मराठवाडी येथील वयस्कर महिला सुभद्रा शिंदे यांची रोख रक्कम तत्काळ मिळावी.
- उमरकांचन येथील तीन धरणग्रस्तांची शंभर टक्के नुकसान भरपाई शासनाकडे जमा असून, त्यातील ६५ टक्के रक्कम कपात करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळावा.