Satara Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला; उदयनराजेंचे कमबॅक
By नितीन काळेल | Published: June 4, 2024 06:54 PM2024-06-04T18:54:15+5:302024-06-04T18:55:13+5:30
सेना आमदारांचे मोठे योगदान..
सातारा : पश्चिम महाराष्ट्रात प्रतिष्ठा आणि चुरशीच्या ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजेंनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभूत करत आपणच सातारचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भाजपला दुसऱ्या प्रयत्नात का असेना सातारा मतदारसंघात कमळ फुलवता आले, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजलीच नाही. या पराभवाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सातारा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला. कारण, महायुतीत मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच झाली. शेवटी भाजपने जागा ताब्यात घेत उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरवले, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मतदारसंघ होता. पण, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने लढणार कोण हा प्रश्न होता. शेवटी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास दाखवत निवडणूक चुरशीची निर्माण केली. या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. पण, खरी लढत भाजपचे उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली.
निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजप, तसेच राष्ट्रवादीनेही प्रचारात कोणतीच कसर ठेवली नाही. विशेषकरून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी कऱ्हाड भागावरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले, तर या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदींसह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे निवडणुकीत चूरस वाढली, तसेच कोणी उमेदवार जिंकला, तरी त्यांचा काठावरचाच विजय असणार हे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणेच सर्व घडून आले. या निवडणुकीत उदयनराजेंनी बाजी मारून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला जोरदार हादरा दिला आहे.
‘वंचित’चा परिणाम फारसा नाही..
सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशांत कदम हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते. पण, त्यांनाही या निवडणुकीत अपेक्षित अशी मते मिळवता आली नाहीत. त्यामुळे विजयी आणि प्रमुख पराभूत उमेदवारावर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. पण, संजय गाडे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांचे चिन्ह आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचे तुतारी हे चिन्ह एकसारखेच वाटत होते. त्यामुळे गाडे यांनी शिंदे यांची काही मते आपल्याकडे वळविल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
सेना आमदारांचे मोठे योगदान..
सातारा लोकसभेसाठी विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यामधील दोन आमदार हे शिंदेसेनेचे आहेत. भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयात या दोन्ही आमदारांचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे, तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही उशिरा का असेना निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय साकारला.